जिल्हा परिषद शाळांची अवस्था अस्वस्थ करणारी – खासदार इम्तियाज जलील

वैजापूर तालुक्यातील तिडी येथे सांस्कृतिक कार्यक्रम

वैजापूर ,३१ जानेवारी / प्रतिनिधी :-शिक्षण व आरोग्याच्या विषयावर मी कधीच तडजोड करत नाही तसेच कुणाला करूही देत नाही. परंतु, आजही जिल्हा परिषद शाळेची अवस्था बघितली तर मन अस्वस्थ करणारे चित्र बघायला मिळत आहे. कारण तब्बल एक हजार सहाशे वर्गखोल्या आपल्या जिल्ह्यात पत्र्याच्या आहेत. हे आकडे नुकतेच झालेल्या सर्व्हेनुसार समोर आले. त्यामुळे या सर्व शाळांवरील पत्रे जोपर्यंत काढून त्या ठिकाणी आरसीसी मध्ये बांधकाम होत नाही. तोपर्यंत माझा सरकारकडे पाठपुरावा सुरुच राहील असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले.

वैजापूर तालुक्यातील तिडी येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास सर्वपक्षीय नेतेमंडळीची उपस्थिती होती. यावेळी आमदार रमेश पाटील बोरणारे, भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल, शिंदे गटाचे शहराध्यक्ष पारस घाटे, एमआयएमचे तालुका अध्यक्ष अकील कुरैशी यांची प्रमुख उपस्थिती होती..यावेळी जलील म्हणाले, चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद येथे खासदार, आमदार व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कामांची यादी सादर करत शैक्षणिक कामासाठी 18 कोटी निधीची मागणी केली.परंतु हा निधी शैक्षणिक कार्यसाठी पुरेसा नसल्याने मी त्याचा विरोध करून फडणवीस साहेबाना विनंती केली. बाकीच्या ज्या काही योजना असतील त्यांना निधी कमी द्या मात्र, जिल्हा परिषद शाळेला निधी वाढवून देण्याची मागणी केल्याचे जलील यांनी सांगितले.या प्रसंगी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

वास्तव्य आणि वस्तुनिष्ठतेचेही भान…!

राजकारणात सर्वपक्षीय व्यासपीठ हे जणू एकमेकांवर कडी करण्याचे मैदानच बनते. मग ते विकासकामांचे असो वा सामाजिक व्यासपीठ, कोणीही ही संधी सोडत नसते.खासदार जलील यांनी शैक्षणिक कार्यक्रम असल्याने राजकारण बाजूला करत वास्तव आणि वस्तुनिष्ठेतेचे भान ठेवल्याचे दिसून आले. सत्तेत नसणाऱ्याना विकासकामे करण्यासाठी निधी मिळत नाही. अनेक अडचणी येतात याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. राज्यात व केंद्रात तुमची सत्ता आहे. त्यामुळे निधीची अडचण तुम्हाला येणार नाही तुम्ही ती शिक्षणाच्या चांगल्या कार्यसाठी देण्याचे प्रयत्न करावे अशी सूचनाही त्यांनी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे व भाजपचे नबी पटेल यांना केली.