वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी २४२ उमेदवारी अर्ज दाखल

वैजापूर ,४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या ​१८ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी  एकूण २४२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या ​१८ जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली होती. 3 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या प्रस्थापित माजी  संचालकांसह नवीन चेहऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपासून प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून 6 एप्रिल रोजी वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवसापासून ते 20 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

एकंदरीतच 18 जागांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची 242 एवढी संख्या पाहता राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या माघारीसाठी नेत्यांना विनवणी करण्याशिवाय पर्याय नाही. 5 एप्रिल रोजी होणाऱ्या छानणीत किती जणांचे उमेदवारी अर्ज बाद होतात अन् त्यानंतर निवडणूक आखाड्यातून कितीजण माघार घेतात? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून आहे.