शेताच्या सामाईक बांधाच्या वादातून भावजयीसह पुतण्याचा खून ; दीरास दुहेरी जन्मठेप

जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल ; वैजापूर तालुक्यातील जिरी येथे घडली होती घटना 

वैजापूर ,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शेताच्या सामाईक बांधाच्या क्षुल्लक वादावरून भावजयीसह पुतण्याचा कोयत्याने वार करून खून करणाऱ्या दीरास वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.गेल्या आठवड्यातच खून प्रकरणात एकास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची येथील न्यायालयाच्या इतिहासात दुसरी घटना आहे. 

राजेंद्र उर्फ बापू दामोदर सुर्यवंशी

राजेंद्र उर्फ बापू दामोदर सुर्यवंशी ( रा. जिरी ता.  वैजापूर ) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रुपाली संजय सुर्यवंशी ( 32 ) व गोकुळ संजय सुर्यवंशी ( 15 ) दोघे रा.  जिरी ता. वैजापूर अशी हत्या झालेल्या मायलेकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रुपाली हिचा पती वाहनचालक असल्यामुळे तो नेहमीच बाहेरगावी असायचा. 6 जून 2017 रोजी शेताच्या बांधावरून दीर राजेंद्र सुर्यवंशी व भावजयी रुपाली सुर्यवंशी यांच्यात वाद झाला होता. या दोघांचेही शेत लगतच असून सामाईक बांधावर सिमेंटचे खांब रोवलेले होते. या बांधावर रोवलेले खांब राजेंद्र याने काढल्यामुळे रुपाली हिने त्याला विरोध केला. वादाचे पर्यावसन सरळ खून करण्यात झाले. राजेंद्र याने रागाच्या भरात रुपालीच्या मानेवर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून केला. त्याचवेळी तिचा मुलगा गोकुळ हा तिला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता राजेंद्र याने त्याच्याही मानेवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. घटनास्थळी घरातील अन्य सदस्यही उपस्थित होते. परंतु त्याचा रौद्रवतार पाहून सर्वांचीच गाळण उडाली.  ही घटना तालुक्यातील जिरी शिवारात घडली होती. या दुहेरी हत्याकांडामुळे तालुक्यातील समाजमन सुन्न झाले होते.

सरकारी वकील नानासाहेब जगताप

घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांच्या ताफ्यासह मृत रुपालीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर राजेंद्र सुर्यवंशी याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान प्रकरणाचा तपास केल्यानंतर शिऊर पोलिसांनी वैजापूर येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मृत रुपाली हिच्या मुलीसह पुतणी, डाॅक्टर, तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांनी रुपाली व गोकुळ सुर्यवंशी या दोघांच्या हत्येप्रकरणी दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक वर्षाच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले.