वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा कार्यान्वित करा -प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

अन्यथा जागरण – गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा 

वैजापूर ,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील शंभर खाटांच्या वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रणा व सोनोग्राफी केंद्र मागील अनेक वर्षांपासुन बंद आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी  वैद्यकिय अधिक्षक यांची भेट घेऊन त्यांच्याशी‌ याबाबत चर्चा केली व निवेदन दिले.

वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. मात्र या दोन्ही सुविधा बंद असल्याने रुग्णांना त्याचा लाभ घेता येत नाही.  या सुविधांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना महागड्या खासगी सेवा घ्याव्या लागत असून त्यांची मोठ्याप्रमाणावर आर्थिक लुट होत असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश सावंत, शहराध्यक्ष विशाल शिंदे, तालुका सचिव रामचंद्र पिल्दे व तालुका उपाध्यक्ष सागर गुंड यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. येत्या दहा दिवसांत उपजिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन व सोनोग्राफी सेंटर सुरु न केल्यास उपजिल्हा रुग्णालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात दिला आहे. यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.