राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड

संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही- हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूर कागलमधील घरी ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहा वाजता जवळपास २० अधिकारी अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले.

अप्पासाहेब नलावडे साखर कारखानाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. कारखान्यातल्या १०० कोटी घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केली होती.यापूर्वीही जुलै २०१९ मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती.

आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता.सकाळी ६ वाजता ईडीच्या एका पथकाने कोल्हापूरमधील हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर छापे टाकले. त्यानंतर पुण्यातील त्यांच्या घरावरही छापेमारी सुरु करण्यात आली. सकाळपासून हा तपास सुरु असून त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच, त्यांच्या सर्मथकांनी कागलमध्ये जमण्यास सुरुवात केली आणि गोंधळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याची देखील त्यांनी टीका केली.

आज झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीने माझ्या निवासस्थानी, मुलांच्या आणि मुलीच्या घरावर, कारखान्यावर छापे टाकले. पुण्यातही काही व्यक्तींच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ही कारवाई करण्याआधी ईडीने मला कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा समन्स दिले नाही. संबंधित कारखान्याशी माझा काहीही संबंध नाही. या कारखान्यावर चार वर्षांपूर्वी प्राप्तीकर विभागाने छापे टाकले. त्यावेळीही काहीही समोर आले नव्हते. तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर मी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली आहेत, अशी भूमिका आ. हसन मुश्रीफ यांनी मांडली. किरीट सोमय्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविरोधात त्यांच्या विरोधात दीड कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रिपदाच्या मार्फत मिळवलेला काळा पैसा हा बोगस कंपन्यांमार्फत कारखान्याकडे वळवला हा सोमय्यांचा मुख्य आरोप आहे. मी कारख्यानाचा संचालक नाही. पुण्यातील चंद्रकांत गायकवाड हे माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्यासोबत कुठलाही व्यावसायिक संबंध नाही, त्यांच्या कुठल्याही कंपनीशी माझा व्यवहार नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

छापे कशासाठी टाकले, मला समजायलाच मार्ग नाही. संध्याकाळी तपासणी पूर्ण झाल्यावर माहिती मिळेल. विशिष्ट धर्माच्या लोकांना भाजप टार्गेट करत आहे का, असा सवाल मुश्रीफ यांनी केला. सत्ता येऊन सहा महिने झाले आहेत तरी हे कशासाठी चालले आहे कळत नाही. माझ्या मुलीच्या कुटुंबीयांनाही भयभीत करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे, सत्ता आल्यानंतरही हे थांबत नाही, याचे मला विशेष वाटते, असे मुश्रीफ म्हणाले.