वैजापूर बाजार समिती निवडणुकीत ​९९​ टक्के मतदान

वैजापूर ,२८ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी आठ मतदान केंद्रावर शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत विक्रमी ​९९​ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावत व्यत्यय आणला. मात्र त्याचा मतदानावर कुठलाही परिणाम जाणवला नाही. चार मतदार संघातील तीन हजार ३० मतदारांपैकी तब्बल दोन हजार ९९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीत सहकार सोसायटी मतदार संघातील एक हजार 411 मतदारांपैकी एक हजार 396 (98 टक्के) मतदारांनी मतदान केले. तसेच ग्रामपंचायत मतदारसंघात एक हजार 135 मतदारांपैकी एक हजार 127 (99 टक्के), व्यापारी मतदारसंघात 162 पैकी 160 (98 टक्के) व हमाल मापाडी मतदारसंघात 322 पैकी 311 (96 टक्के) मतदारांनी मतदान केले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. सहकार संस्था मतदारसंघातील 11 व ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 अशा एकूण पंधरा जागांसाठी वैजापूर, खंडाळा, लोणी, शिऊर, गारज, दहेगाव व लाडगाव या सात मतदान केंद्रावर 99 टक्के व महालगाव येथील केंद्रावर 97 टक्के मतदानाची नोंद झाली. व्यापारी मतदार संघातील 2 व‌ हमाल मापाडी मतदारसंघातील 1 या तीन जागांसाठी वैजापूर व शिऊर येथील मतदान केंद्रातील बुथवर मतदान घेण्यात आले. या दोन्ही ठिकाणी व्यापारी मतदारसंघात 98 टक्के व हमाल मापाडी मतदारसंघात 96 टक्के मतदान झाले.‌ निवडणुक निर्णय अधिकारी विनय धोटे, विजय सिनगर यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.मतदान शांततेत पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.