नांदूर मध्यमेश्वर कालव्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

वैजापूर ,१९ मे  / प्रतिनिधी :- ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने बेपत्ता झालेल्या मोहन छबु धात्रक (35 वर्ष) या तरुणाचा मृतदेह अखेर तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर तालुक्यातील जातेगाव शिवारात सापडला. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास महालगाव शिरसगाव रस्त्यावर मोहन धात्रक व गणेश धात्रक हे दोघे चुलत भाऊ ट्रॅक्टरने जात असताना पुलाजवळ वळण घेताना नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रॅक्टर कालव्यात पडल्याची घटना घडली होती. या घटनेत गणेश धात्रक याने लोखंडी ॲंगलचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र, मोहन धात्रक हा पाण्यच्या वेगवान प्रवाहासोबत वाहुन गेला होता.

मोहन छबु धात्रक

विरगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्टेबल व्ही. एम.‌बामंदे, जी. आर. थोरात, पोलिस पाटील महेश निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ व धात्रक यांच्या नातेवाईकांनी संपुर्ण कालव्यालगत शोध सुरु केला. अखेर वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहन धात्रक यांचा मृतदेह जातेगाव शिवारात कालव्यात लोखंडी ॲंगलचा अडकलेल्या स्थितीत आढळुन आला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने बाहेर काढुन त्यास वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.शवविच्छेदनानंतर सकाळी अकरा वाजता पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मोहन धात्रक यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.