सोयगाव परिसरात  वादळी वाऱ्याने थैमान ,अनेक घरांची पत्रे उडाली 

सोयगाव,२८  एप्रिल / प्रतिनिधी :- सोयगाव शहरासह परिसरात शुक्रवारी दुपारी दिड तास वादळी वाऱ्याने थैमान घातले.अतिवेगाने सुटलेल्या वाऱ्यात अनेक घरांची पत्रे उडाली, झाडं उन्मळून पडले, विजेचे खांब पडले, वाकले तारा तुटल्या शेती पिकाचे व फळबागाचे नुकसान झाले. सलग तीन दिवस वारा, गारा व पाऊसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची मोठी धांदल उडाली.

सोयगाव शहरात दुपारी साडे बारा वाजता पावसाला सुरुवात झाली..जुन्या पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या बाग परिसरातील बापू काळे व त्यांच्या काकाचे  या दोन गोठ्यावरील पत्रे इंगल सहित उडाले व शंभर फूट दूरवर जाऊन पडले. श्रीकांत बोरसे यांच्या घरावर आदळून रोडवर हे शेड कोसळले त्यामुळे वाल्मिक मंदिर ते जुना बाजार चौक या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद पडली. भवानी नगर येथील विठ्ठल थोटे यांच्या घरावरील पत्रे उडाली.नारळीबाग येथील  केशरबाई महादू कोळी यांच्या घरावरील पत्रे उडाले. अर्जुन आगे यांच्या शेतातील मोठं आंब्याचे झाडं पडले. केळीचे व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. बसस्थानक परिसरातील हॉटेल, टपऱ्या दुकानात वारा शिरल्याने खाद्य वस्तूसह साहित्याचे नुकसान झाले.