निवडणूक प्रकिया सुरळीतपणे पार पाडावी – निवडणूक निरीक्षक वेणूगोपाल रेड्डी

औरंगाबाद, दि.17 :- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने मराठवाडा विभागाचे निवडणूक निरीक्षक तथा राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांनी संबंधितांना निर्देशित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 च्या तयारीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत श्री.रेड्डी यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव किरवले यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी श्री.रेड्डी यांनी जिल्ह्यात मतदानासाठी करण्यात येत असलेल्या तयारीबाबत आढावा घेऊन सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सतर्क राहून नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यात एकूण 206 मतदान केंद्रावर दि.01 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून यामध्ये 98257 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे सांगितले. तसेच मतदार यादी अंतिम झाली असून या निवडणूकीसाठी 35 उमेदवार असल्याचे सांगितले. प्रशासनामार्फत मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली असून निवडणूक कामकाज सोपवण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, मतदान केंद्र प्रमुख, सहाय्यक यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.