झोलेगाव शिवारात विहिरीचा मलबा अंगावर ढासळल्याने तीन परप्रांतीय मजूर ठार ; दोघेजण गंभीर जखमी

वैजापूर ,४ एप्रिल  / प्रतिनिधी :- विहिरीचे काम सुरू असताना विहिरीलगत असलेली मलब्याची थप्पी ( ढिगारा ) ढासळल्याने खाली काम करणारे तीन परप्रांतीय मजूर ठार तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.03)  दुपारी तीन वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारात घडली. दरम्यान यातील दोन मजुरांचा जेसीबी यंत्राच्या साह्याने काही तासातच शोध घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. तिघांना मात्र तब्बल तासांनी विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. मृत व जखमी मजूर हे राजस्थान येथील रहिवासी आहेत. 

सीताराम रावत (35) महावीर रावत (38), बनाजी गुज्जर (35) हे तिघेही या घटनेत ठार झाले तर छोटू भिल्ल (25) व रतनसिंग रावत सर्व रा. भिलवाडा जिल्हा राजस्थान ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

  याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील झोलेगाव येथील साहेबराव करंडे यांच्या याच शिवारातील गट क्रमांक 82 मधील शेतामध्ये विहिरीचे काम सुरू होते. विहिरीचे काम जवळपास 25 फूट म्हणजेच चार परसापर्यंत झाले होते. काम सुरू असताना विहिरीचा मलबा लगतच टाकण्यात आला होता. या ठिकाणी राजस्थान येथील मजूर काम करीत होते. 3 एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे विहिरीत मजूर काम करीत असताना विहिरीलगत असलेली मलब्याची थप्पी अचानक ढासळून तो विहिरीत पडला. त्याचवेळी विहिरीत काम करीत असलेले पाचही मजूर मलब्याखाली दबल्या गेले. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शिऊर पोलिस ठाण्यासह गावातील नागरिकांना कळविली. घटनेचे गांभीर्य ओळखून शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप व पोलिसांचा ताफा घटनास्थळी रवाना झाला. तसेच ही वार्ता वा-यासारखी पसरताच गावकऱ्यांचा जत्थाही घटनास्थळाकडे रवाना होऊन मजुरांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. साधारणतः दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर छोटू भिल्ल व रतनसिंग रावत या दबलेल्या दोन मजुरांना जेसीबी यंत्राच्या साह्याने बाहेर काढण्यात यश आले. दोघांना बाहेर काढल्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे उपचारार्थ शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्राच्या साह्याने  अन्य तीन मजुरांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. विहिरीत अख्खी मलब्याची थप्पी ढासळल्याने शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. परंतु तरीही या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून सीताराम रावत, महावीर रावत व बनाजी गुज्जर या तीन मजुरांचा तब्बल रात्री 8 वाजेच्या सुमारास शोध लागला खरा. परंतु ते तिघेही मृतावस्थेत आढळून आले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान झोलेगाव येथील सरपंच जनार्दन काकडे, किरण सरोवर, नवनाथ राऊत यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन दोघांना वाचविले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.