वैजापुरात हप्ते थकल्याने फायनान्सच्या लोकांनी दुचाकीवर दुचाकी नेली उचलून ; समाज माध्यमांवर व्हिडीओची धूम

वैजापूर ,१७ मार्च / प्रतिनिधी :- एखाद्या खासगी वित्तीय संस्थेकडून हप्त्याने दुचाकी घेतली आणि तिचे हप्ते थकल्यानंतर काय गत होते. याबातची एक चित्रफित सध्या समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारीत होत आहे. एकाने दुचाकीचे हप्ते थकविल्यामुळे वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्या गावात जाऊन दुचाकीवर दुचाकी आणल्याने सर्वत्रच हशा होत आहे. या चित्रफितीने माध्यमांवर धूम केली आहे

शहरातील एका नामांकित खासगी वित्तीय संस्थेने तालुक्यातील शहरानजीक असलेल्या रोटेगाव येथील  एकास दुचाकी घेण्यासाठी कर्ज दिले होते. सुरवातीला काही दिवस संबधित कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुचाकीच्या कर्जापोटी साधारणतः दहा हजार रुपये संस्थेचे बाकी होते. त्यावर व्याजाची रक्कमही आकारण्यात आली होती. कर्जाच्या परतफेडीची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराकडे तगादा सुरू केला. परंतु संबंधित कर्जदाराने प्रतिसाद न दिल्याने वित्तीय संस्थेने कर्मचाऱ्यांना दुचाकी जप्त करून आणण्याचे आदेश दिले. त्यानंतर कर्मचारी दुचाकीवरून कर्जदाराच्या घरी गेले असता तेथे कर्जावर घेतलेली दुचाकी उभी होती. कर्मचाऱ्यांनी मागचा – पुढचा विचार न करता ती दुचाकी उचलून थेट त्यांनी आणलेल्या दुचाकीवर ठेऊन वैजापूर येथे संस्थेच्या कार्यालयात आणली. परंतु कर्मचाऱ्यांनी जेव्हा दुचाकी जप्तीची कारवाई केली. तेव्हा गावातीलच काही ‘टग्यांनी’ या कारवाईची चित्रफित तयार करून समाज माध्यमांवर व्हायरल केली. पाहता – पाहता ती चित्रफित एवढी व्हायरल झाली की,  नेटक-यांनी तिला ‘बघा,  गाडीचे हफ्ते न भरल्याने काय गत होते? त्यामुळे कर्ज घेतानाच विचार’ अशा आशयाचे कॅपशन देऊन उपदेशाचे डोस पाजळले. सध्या या चित्रफितीची समाज माध्यमांवर धूम सुरू आहे. दरम्यान याबाबत सदर प्रतिनिधीने खरा प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘हा प्रकार खरा असून साधारणतः चार दिवसांपूर्वी आम्ही ही दुचाकी जप्त केली होती. जप्तीची कारवाई केल्यानंतर कर्जदाराने उर्वरित रक्कम भरून दुचाकी घरी घेऊन गेल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी जप्तीची कारवाई केल्यानंतर जी चित्रफित तयार करण्यात आली. ती व्हायरल होण्याच्या भीतीनेच संबधिताने थकित रक्कम भरल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु एवढे होऊनही शेवटी जप्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाच.