महालगाव येथे शिंदे – ठाकरे गटात राडा: आमदार रमेश बोरणारेंना काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध विरगाव पोलिसांत गुन्हा दाखल 

वैजापूर, २५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-शिंदे गटात सहभागी झालेले वैजापूरचे शिवसेना  आमदार प्रा. रमेश बोरणारे यांच्यासमोरच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी “50 खोके एकदम ओके” अशी जोरदार घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवल्याने महालगावात शुक्रवारी (ता.26) दुपारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी  आमदार प्रा. रमेश बोरणारे यांचे कार्यकर्ते महेश शिवदास बुणगे यांनी वीरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून राजू गलांडे, योगेश मोहितेसह अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी की, भांड्याच्या दुकानाचे उदघाटनासाठी आ. रमेश बोरणारे, मा. नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी ही राजकीय मंडळी महालगांव येथे आली होती. उदघाटनानंतर आ. बोरणारे हे महेश बुणगे, पारस घाटे, ज्ञानेश्वर टेके, अनिल चव्हाण या कार्यकर्त्यांसोबत गावातील बापूसाहेब झिंजुर्डे यांच्या घरी पोलीस ताफ्यासह जात असतांना रस्त्यात महालगांव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ठाकरे गटाचे  राजू गलांडे, योगेश मोहिते व इतर दहा ते बारा जणांनी आमदार बोरणारे यांचे वाहन पाहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली तसेच काळे झेंडे दाखवले. या प्रकारामुळे ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांत वाद निर्माण होऊन वातावरण तंग झाले होते.

घोषणा देणाऱ्यांना समजावून सांगत असताना पोलीसही वाहनातून उतरले. मात्र, पोलिसांशी हुज्जत घालत शिविगाळ करून लोटालाटी केली तसेच आमदार बोरणारे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार आ.बोरणारे यांचे कार्यकर्ते महेश बुणगे यांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरून ठाकरे गटाचे राजू गलांडे, योगेश मोहिते यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्त्यांविरुद्ध  वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेनंतर गावात दंगाकाबू पथक दाखल झाले असून महालगावात सध्या शांतता असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक रोडगे यांनी दिली.