वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा

८२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान  ;  शासनाकडे प्रशासनाचा १११ कोटींचा प्रस्ताव


वैजापूर ,२२ जून/ प्रतिनिधी :- अतिवृष्टी, पुर किंवा चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे किंवा जमिनीचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून सरकारतर्फे बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यात येते. मात्र, महसुल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद नसतांना सुद्धा मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. म्हणुन अतिवृष्टीच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार लाख एक हजार ४४६ बाधित शेतकऱ्यांसाठी २२६ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या शेतकऱ्यांचे दोन लाख ५३ हजार २३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. हा निधी लवकरच बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी न झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत मिळणार का याबाबत साशंकता होती. मात्र तालुक्यात मागील खरीप हंगामात जुन ते ऑक्टोबर या कालावधीत सततच्या पावसाने कापुस, मका, तुर, बाजरी, भुईमुग आदी पिकांचे सुमारे ८२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी झाल्याचे पंचनाम्यावरुन स्पष्ट झाले होते. त्यासाठी प्रशासनाने १११ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. वैजापुरचे आमदार रमेश पाटील बोरनारे व पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दोन महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात शेतकऱ्यांना शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शासनाने संपुर्ण राज्यासाठी सहा हजार ३९६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती. मात्र, यातुन वैजापुरचे नाव वगळण्यात आले होते. मात्र आता २०२२ च्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून विभागीय आयुक्तांकडुन प्राप्त झालेल्या प्रलंबित निधीच्या मागणी प्रस्तावानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.