शिऊर बंगला येथे मटका अड्डयावर छापा ; १२ जुगाऱ्यांना अटक

वैजापूर ,४ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या पथकाने शिऊर बंगला येथील मटका अड्डयावर छापा टाकुन १२ जुगाऱ्यांना पकडले. संजय कारभारी जाधव या जुगाऱ्याने पोलिसांना बघुन पळ काढला. या कारवाईमुळे शिऊर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध मटका अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक काळे, पोलिस अंमलदार जोनवाल, गायकवाड, सरोदे व मोरे यांच्या पथकाने अचानक छापा टाकुन अड्याचा पर्दाफाश केला. यावेळी सतीश जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे, संभाजी जाधव, उत्तम भंवर, गणपत पवार, संतोष पठारे, समाधान वंजारी, भानुदास पठारे, गोकुळ गोरे, चंद्रभान पवार, इब्राहिम शेख, आसाराम पगारे हे जुगार खेळताना आढळुन आले.

पोलिसांनी त्यांच्याकडुन तीन दुचाक्या, अकरा मोबाईल व रोख रक्कम असा एक लाख ४४ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात तेरा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.