वैजापूर युवासेनेतर्फे राज्यपाल कोश्यारी यांना बुध्दीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी बदाम

वैजापूर, २४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी नेहमीच वादग्रस्त विधाने करून चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या बुध्दीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी वैजापूर युवसेनेतर्फे पोस्टाने बदाम पाठविण्यात आले आहे.

यासंदर्भात युवासेनने राज्यपाल कोश्यारी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडीत असताना आपला बुध्दीभ्रम झाल्याचे जाणवत आहे. आपण दिवसरात्र महाराष्ट्राच्या हितासाठी काम करीत असताना आपली शारीरिक व मानसिक संतुलन खराब होत असल्याचे आपल्या वर्तनातून दिसून येत आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो काल ही होता.. आजही आहे..आणि भविष्यातही राहील. नव्हे तर चंद्रसूर्य असेपर्यंत राहील. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले- आंबेडकर यांच्यासह महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून संबंध महाराष्ट्रातील नव्हे तर देशाचा जाणीवपूर्वक अपमान करीत आहात.करिता आपल्या बुध्दीमध्ये सुधारणा होणेसाठी आपणास बदाम पाठवित आहे. तरी आपण यापुढे शब्दवाणीमध्ये सुधारणा करावी जेणेकरून महाराष्ट्रातील महापुरुषांचा आदर कायम राहील. या पत्रावर युवासेनेचे वैजापूर तालुकाप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे, उपजिल्हाप्रमुख अक्षय पाटील साठे, शहरप्रमुख राहुल पाटील साळुंके यांच्या सह्या आहेत.