वैजापुरात श्री जगदंबा देवी यात्रा महोत्सव उत्साहात

वैजापूर ,२८ मार्च / प्रतिनिधी :- वैजापुरचे वैभव व साडेतीन शक्तीपीठ असलेले ग्रामदैवत श्री जगदंबा देवी  यात्रा चैत्र शुद्ध पंचमीला उत्साहात पार पडली. अत्यंत उत्साह व आनंदात देवी उत्सव झाला.

समस्त शहरवासीय व यात्रा कमिटीने या कार्यक्रमाची नियोजन बद्ध आखणी केली होती. या निमित्ताने शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. गावचे पाटील गुलाबराव साळुंके व जेष्ठ नागरिक यांच्याहस्ते देवी पालखीतील मूर्तीची  पूजा करण्यात आली.

या समयी मुख्य पुजारी राजू राजस व त्यांचे कुटुंबीय जयंत इनामदार,रमेश जोशी, किशोर राजस, श्याम राजस,अरुण राजस यांनी विधिवत पूजा केली. यावर्षी पालखी मिरवणूकीत आदिवासी भोवाडे नृत्य व पक्षी तसेच महिषासुर मर्दनी व नवदुर्गा देखावा सादर करण्यात आला होता.

याशिवाय पारंपरिक नगारा वाद्य, शहरातील ब्रास बँड यांनीही यावर्षी पालखी मिरवणूकित चैतन्य व उत्साह आणला. सायंकाळी पांच वाजता निघालेली मिरवणूक रात्री साडे दहा वाजता देवी मंदिरात पोहचली तेथे देवीची महाआरती संपन्न झाली. या महाआरतीत शहरातील मान्यवर सहभागी झाले होते. शोभेची दारू ही या प्रसंगी सोडण्यात आली.