जेईई परीक्षा-2021, एक वर्षात चार वेळा घेण्याविषयीच्या सूचनांचे सकारात्मक अध्ययन सुरु – रमेश पोखरियाल ‘निशंक’

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 चे सदिच्छादूत विद्यार्थीच- रमेश पोखरीयाल
शिक्षणमंडळाच्या परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यासाठी सर्व हितसंबंधी गटांशी चर्चा सुरु
Image

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आज  शिक्षण मंडळांच्या आगामी वार्षिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांबाबत देशभरातले शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी आभासी स्वरूपात संवाद साधला. या एका तासाच्या संवादात त्यांनी शाळेच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि इतर विषयांबाबत सर्वांनी उपस्थित केलेल्या विविध शंका आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

यावेळी बोलतांना, पोखरीयाल म्हणाले की विद्यार्थी, देशाचे नवे शैक्षणिक धोरण-2020 चे सदिच्छादूत ठरतील.  हे धोरण यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे, असे सांगत, या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. लवकरच विद्यार्थ्यांसाठी शाळेचे जुने दिवस परत येतील, अशी आशा व्यक्त करतांनाच पोखरियाल यानी सर्व विद्यार्थ्यांना कोविडविषयक मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

माय बुक, माय फ्रेंड’ या मोहिमेला विद्यार्थ्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाचे स्मरण करतांनाच त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची सवय कायम ठेवण्याचे आवाहन केले.

जेईई परीक्षांचा अभ्यासक्रम आणि तारखांविषयी उपस्थित करण्यात आलेल्या शंका आणि प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी सांगितले की जेईई (मेन) 2021 परीक्षा  वर्षातून चार वेळा घेतली जावी या सुचनेवर आम्ही सकारात्मक विचार करतो आहोत, असे त्यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या शेवटी पहिली परीक्षा (आणि त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे 2021) अशी प्रत्येकवेळी तीन ते चार दिवसांसाठी घेतली जाण्याचा प्रस्ताव आहे, असे त्यांनी सांगितले. जेईई (मेन) साठीचा अभ्यासक्रम गेल्यावर्षी प्रमाणेच राहणार आहे, मात्र, परीक्षार्थींना, 90 प्रश्नांपैकी 75 प्रश्न (30 प्रश्नांपैकी 25 प्रश्न –प्रत्येकी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र) सोडवण्याची मुभा दिली जाण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. जेईई मेन -2020 मध्ये प्रत्येक पेपरमध्ये 75 प्रश्न (गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र- प्रत्येकी 25) होते, ज्यां सर्वांची उत्तरे विद्यार्थ्यांन लिहायची होती, अशी महिती पोखरीयाल यांनी दिली.

Image

नीट चा अभ्यासक्रम आणि तारखांविषयीच्या प्रश्नांना उत्तर देतांना त्यांनी सांगितले की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांच्याशी सल्लामसलत करुन नीट (UG) 2021 चे वेळापत्रक निश्चित केले जात असून लवकरच ते जाहीर केले जाईल. नीट (UG अर्थात पदवी) परीक्षेचा अभ्यासक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच  असेल, अशी माहिती त्यांनी दिली. परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन याविषयी विचारले असता, त्यांनी सांगितले की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या  सल्ल्याने हा निर्णय घेतला जाईल.

दहावी आणि बारावीच्या केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षांविषयी माहिती देतांना ते म्हणाले की या परीक्षांच्या तारखा ठरवण्यासाठी सर्व हितसंबंधी गटांशी चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर या तारखा निश्चित करुन लवकरच जाहीर केल्या जातील.

काहीही शंका असल्यास, शाळा प्रशासन सीबीएससी शी संपर्क साधू शकते अथवा सीबीएसशी चे संकेतस्थळ – www.cbseacademic.nic.in.  येथे भेट देऊ शकते. सीबीएससी ला प्रत्येक धड्याचे व्हिडीओ त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक हित जपण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. परीक्षा, अभ्यासक्रम आणि इतर माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन दिली जाईल, असे पोखरीयाल म्हणाले.