नगर वने विकसित करण्यासाठी पुणे शहराचे वारजे वनक्षेत्र “रोल मॉडल”-पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की आपल्याला झाडं लावण्याची आणि जगवण्याचीही गरज आहे. आज जागतिक पर्यावरण दिनी हाच आपला संदेश आहे,” 

मुंबई, 5 जून 2020

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पर्यावरणावर भर दिला आहे. आपल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले होते की आपल्याला झाडं लावण्याची आणि जगवण्याचीही गरज आहे. आज जागतिक पर्यावरण दिनी हाच आपला संदेश आहे, आज विश्व पर्यावरण दिवस आहे, या वेळेचा विषय आहे- जीवविविधता. आपण आज संकल्प करुया, पाणी वाचवण्याचा, वीज वाचवण्याचा, पर्यावरण वाचवण्याचा, आणि स्वच्छता राखण्याचा, पेट्रोल वाचवण्याचा, येवढे आपण जर केले तर आपण निश्चित पर्यावरण दिवसाची प्रतिज्ञा पूर्ण केली, असे होईल”, असे पर्यावरण मंत्री, प्रकाश जावडेकर जागतिक पर्यावरण दिन सोहळ्याप्रसंगी म्हणाले.

जेव्हा पुणेकरांनी ओसाड जमिनीवर झाडं लावून बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतला, पुण्यातल्या ओसाड भूमीचं रूपांतर जैव विविधतेने नटलेल्या नगर वनात झालं. वारजे नगर वनाची ही यशोगाथा जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात दाखवली गेली.

जगाची एकूण लोकसंख्या आणि पशुसंख्येपैकी 16 टक्के लोकसंख्या भारतात आहे. दोघांनाही अन्न आणि पाण्याची गरज असते. मात्र आपल्याकडे जगाच्या तुलनेत केवळ 2.5टक्के भूमी आणि 4 टक्के नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. तरीही, आपण जागतिक जैव-विविधतेपैकी 8 टक्के जैव विविधतेचे संरक्षण केले आहे. ही छोटी उपलब्धी नाही. कितीही अडचणी वा बंधने असली तरी, जैवविविधता सांभाळणे ही भारतीय संस्कृती आहे. जंगलांचे रक्षण करण्यासाठी राजस्थानच्या 300 लोकांनी आपले प्राण वेचले. जगातील सर्व प्रजाती, आपल्या जीवनाचाच एक भाग आहेत याचे, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्मरण करून दिले.

आपल्याकडे, ग्रामीण भागात जंगलं आहेत, मात्र शहरी भागात ती फार नाहीत. आपल्याला आणखी जंगलं विकसित करण्याची गरज आहे, म्हणूनच आम्ही ‘नगर वने’ योजना सुरु करत आहोत. आज आपण 200 शहरांत नगर वने विकसित करण्याचा प्रकल्प सुरु करत आहोत. वारजे नगर वन, हे सरकारी- खाजगी भगीदारीतून साकारणाऱ्या प्रकल्पाचे उत्तम उदाहरण आणि देशभरात 200 शहरांमध्ये ‘नगर वन’ विकसित करण्यासाठीचे ‘मॉडेल’ ठरले आहे. या उपक्रमासाठी ‘कॅम्पा’ निधीतून अर्थसाह्य केले जाईल, असे श्री प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले. 

“नगरवनांचा किंवा शहरी वनक्षेत्रांचा विकास केल्यास, वातावरणातून 2.5 ते 3 अब्ज टन कार्बन डाय-ऑक्साइड काढून घेण्याचा भारताचा निर्णय प्रत्यक्षात आणण्यास मदत होईल. अशी वनक्षेत्रे, शहरांची फुप्फुसे म्हणूनही काम करतील”,  असे श्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

शहरांतील वनजमीन व क्षरण पावलेली जमीन यांचे आरेखन करून,  नगरवने निर्माण करण्यासाठी ते भाग राखीव ठेवावेत, व यास जन-आंदोलनाचे स्वरूप द्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नगरपालिकांना केले. जनसहभागातून तयार झालेल्या उत्तम नगर वनांना पुरस्कार देण्याचा आमचा मानस आहे, अशी घोषणा, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

नगर वनांसाठीच्या उपयुक्त सूचना आणि माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आले.

“कोविड-19 आजाराच्या माध्यमातून निसर्ग आपल्याला सांगतो आणि आठवण करुन देतो आहे की आपण निसर्गसंरक्षणासाठी अधिक काळजीपूर्वक विशेष प्रयत्न करायला हवे आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, कार्बन उत्सर्जन तातडीने कमी करण्याची गरज आहे. यासाठी वृक्षलागवड हा महत्त्वाचा उपाय आहे व तो प्रत्यक्षात आणलाही जात आहे. यावर्षी देशासमोरचे ध्येय वाढवून 145 कोटींपर्यंत नेण्यात आले आहे. वृक्षारोपण ही ‘जनचळवळ’ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला असलेल्या मोकळ्या जमिनीवर एक तरी झाड लावण्याचं ठरवलं, तर त्यामुळे हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.  शहरांमधील वनक्षेत्रांचे जतन करण्याची प्रतिज्ञा आपण आज गांभीर्यपूर्वक केली पाहिजे. याचाच विचार करून, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाने जागतिक पर्यावरण दिनाची मध्यवर्ती संकल्पना म्हणून ‘नगर वन / शहरी वनक्षेत्र’ या संकल्पनेची निवड केली.”  असे पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो यावेळी म्हणाले.

महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड, यावेळी म्हणाले की वन्यजीवन आणि जैववैविध्याच्या बाबतीत महाराष्ट्र अतिशय संपन्न आणि समृद्ध आहे. महाराष्ट्राचा 20% भाग वनाच्छादित आहे. वन्यजीवनाचे जतन करण्यासाठी आणि जैववैविध्यात वाढ करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत.

पुण्यात सुमारे 9,000 एकर वनजमीन असून, शहरीकरणामुळे आता हे भाग शहराच्या ऐन मध्यवर्ती भागात आले आहेत. वारजे शहरी वनक्षेत्र हा, अतिक्रमणाच्या सावटाखाली असणारा असाच एक भाग होता. 2015 साली, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापासून प्रेरणा घेत, वारजेला पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टीने एक ‘हरितस्थळ’ म्हणून रूपांतरित करण्याचा अग्रणी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सुमारे 1,000 लोक इथे दररोज भेट देतात. आज जैववैविध्याने युक्त वारजे शहरी वनक्षेत्रात, वनस्पतींच्या 23, पक्ष्यांच्या 29, फुलपाखरांच्या 15, सरपटणाऱ्या 10 आणि सस्तन प्राण्यांच्या 3 प्रजाती आहेत. शहरी भागात वनक्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी, याच उदाहरणाचे अनुकरण भारतभरात सर्वत्र केले जाऊ शकते. अशी माहिती मुख्य वन संवर्धक, पुणे क्षेत्र यांनी दिली.

ओसाड भूमीवर नंदनवन विकसित करण्याच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून, केंद्र सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  नगर वने हा प्रकल्प सुरु केला.

PPP भागीदारीतून हे ‘स्मृतीवन’ अस्तित्वात आले आहे. 2015 ते 2017 या काळात वारजे इथं सुमारे 6,500 झाडं लावली गेली जी आता 20 ते 30 फूट उंच वाढली आहेत.अनेकांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिनिमित्त झाडं लावली आणि दत्तक घेतली. पुण्यातील वारजे शहरी वनक्षेत्र, दरवर्षी 1.29 लाख किलो कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते. तर 5.62 लाख किलो ऑक्सिजनची म्हणजे प्राणवायूची निर्मितीही करते. पुण्यातील वारजे शहरी वनक्षेत्र, परिसंस्थेचा समतोल राखण्याबरोबरच सामाजिक विकासासाठीही मदत करते. येणाऱ्या पिढ्यांच्या दृष्टीने, हे एका योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. 

“नगर वने शहराची फुफ्फुसे असतात. वारजे नगर वन पुणेकरांना स्वच्छ हवा देते.हवामान बदलाचा सामना करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. माझी प्रत्येकाला आग्रहाची विनंती आहे की त्यांनी वन उभारावतीत आणि दररोज स्वच्छ हवा घ्यावी”, असे टेरी संस्थेच्या संस्थापक संचालक श्रीमती विनिता आपटे यावेळी म्हणाल्या. 

आम्ही सुरू केलेल्या एका उपक्रमाला अतिशय सुंदर अशा जैववैविध्य केंद्राचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहून आनंद वाटला. पुणे शहरात अधिकाऱ्यांनी केलेली शहरी वनक्षेत्राची निर्मिती, खरोखरच कौतुकास्पद आहे. या प्रक्रियेत आमचाही सहभाग असणे, ही मानाची गोष्ट आहे असे पर्सिस्टंट सिस्टिम चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ आनंद देशपांडे म्हणाले.

यावेळी महासंचालक, वने  म्हणाले की आज जागतिक लोकसंख्येचा मोठा भाग शहरी भागात राहतो.जर आपण त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या नाहीत आज नागरी भागातील निसर्ग आणि जैव विविधता समजून घेतली नाही,  तर आपली शाश्वत विकासाची उद्दिष्टे यशस्वी होणार नाहीत. शहरांमध्ये पाण्याचा तुटवडा प्रामुख्याने जाणवत आहे. शहरांसाठी जंगले हाच पाण्याचा मुख्य स्रोत असतो. यामुळेच, शहरी वनक्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. हा उपक्रम पुढे नेल्याबद्दल त्यांनी मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानले.

“वारजे मधील नगर वनांसारखे उपक्रम आणि भारतातील इतर अनेक हरित उपक्रम बघता, हे सिद्ध होतं की प्रत्येकजण काही ना काही बदल घडवू शकतो. आपण निसर्गावर किती अवलंबून आहोत हे कोविड-19 ने जाणवून दिले. निसर्गाला आपली असेल त्यापेक्षा अधिक गरज आपल्याला निसर्गाची असते, हे समजून घेण्याची ही वेळ आहे. अखिल मानवतेच्या जीवनात एक नवा सामाजिक करार आणण्यासाठी, आपले निसर्गाबरोबरचे नाते पुन्हा शोधून नव्याने प्रस्थापित करण्याची ही वेळ आहे. कोविड-19 च्या निमित्ताने, वसुंधरेने आपल्याला एक महत्वाचा इशारा दिला आहे की आपल्याला आपल्या जीवनशैलीचे मार्ग आपल्याला बदलावेच लागतील. आता वेळ आली आहे- शाश्वत विकासासाठी, निसर्गाची हाक ऐकण्याची, कृती करण्याची, निसर्गाचे संरक्षण करण्याची. आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीचे संरक्षण करायला हवे”, असे संयुक्त राष्ट्रांच्या  वाळवंटीकरणाविरोधातील करारसंस्थेचे कार्यकारी संचालक म्हणाले

आपल्याला निसर्गाकडे परत जावेच लागेल. शहरांना आज मोठ्या वनक्षेत्रांची गरज आहे, माझी महापालिका संस्थांना विनंती आहे की त्यांनी पुढाकार घेऊन काही भाग शहराची फुफ्फुसे सुरक्षित करण्यासाठी, राखीव ठेवावा. केंद्रीय पर्यावरण, वनमंत्रालय या कामांसाठी  सर्वतोपरी मदत करेल असे पर्यावरण सचिव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *