सामाजिक न्यायाच्या योजनांची माहिती १४४ गावांत जाणार ;पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना

छत्रपती संभाजीनगर,८ जानेवारी / प्रतिनिधी :-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विशेष घटक योजना सन २०२३-२४ साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथास आज राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील १४४ गावात हा चित्ररथ जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आदी उपस्थित होते. चित्ररथाद्वारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयी माहिती जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री भुमरे यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.