अवैधरित्‍या देशी दारुची विक्री केल्या प्रकरणात आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

छत्रपती संभाजीनगर ,६ मे  / प्रतिनिधी :-अवैधरित्‍या देशी दारुची विक्री केल्याप्रकरणात आरोपी प्रवीण ​ म्हसु वाहुळ (४०, रा. नागसेन नगर, उस्‍मानपुरा) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. छल्लानी यांनी शनिवारी दि.६ मे रोजी ठोठावली.

या प्रकरणात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍याचे तत्कालीन अंमलदार संयजसिंग रतनसिंग डोभाळ यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २२ मे २०१७ रोजी दुपारी फिर्यादी हे सहकाऱ्यांसह  हद्दीत गस्‍त घालत होते. त्‍यावेळी नागसेन नगर परिसरात एक व्‍यक्ती आपल्याच घरासमोर अवैधरित्‍या देशी दारुची विक्री करित असल्याची माहिती गस्‍तीवरील पोलिसांना मिळाली. माहिती आधारे पोलिसांनी छापा मारुन अवैधरित्‍या देशी दारुची विक्री करणारा आरोपी प्रवीण ​ वाहुळ याला पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍या ताब्यातून १३०० रुपये किंमतीच्‍या २५ देशी दारुच्‍या बाटल्या हस्‍तगत करण्‍यात आल्या. आरोपी विरोधात उस्‍मानपुरा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात तपास अधिकारी तत्कालीन पोलिस नाईक एस.डी. गाडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्‍यायालयाने आरोपी प्रवीण ​ वाहुळ याला महाराष्‍ट्र दारुबंदी कायद्याच्‍या कलम ६५ (ख) अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार एस.बी. भागडे यांनी काम पाहिले.