पैसे न दिल्याने हॉटेलचालकावर प्राण घातक हल्ला:तिघा आरोपींना पोलिस कोठडी

छत्रपती संभाजीनगर ,६ मे  / प्रतिनिधी :-​ ​पैसे न दिल्याने हॉटेलचालकावर प्राण घातक हल्ला केल्याप्रकरणी हर्सुल पोलिसांनी आरोपींपैकी तिघांच्‍या शुक्रवारी दि.५ मे रोजी सायंकाळी मुसक्या आवळल्या. तिघा आरोपींना ८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी आर.व्‍ही. सपाटे यांनी शनिवारी दि.६ दिले.अमोल शिवाजी पवार (२६), दिनेश अशोक पवार (२०, दोघे रा. गल्ली नं. ६, सुरेवाडी, हर्सुल) आणि सचिन ऊर्फ स्‍वप्निल संतोष तांबे (२४, रा. धनगर गल्ली, हर्सुल) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात हॉटेल चालक राहुल ऊर्फ विशाल तुळशीराम कोरेवाड (२७, रा. वसंतनगर, जाधववाडी) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्‍या सुमारास फिर्यादी हे हॉटेल बंद करुन दुचाकीने घरी जात असताना शरद टी पॉईन्‍ट येथे ओळखीचे दिनेश पवार आणि अमोल पवार असे दोघे भेटले. त्‍यांनी फिर्यादीकडे शंभर रुपयांची मागणी केली, त्‍यावर फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितले. त्‍यामुळे त्‍यांच्‍यात बाचाबाची झाली. त्‍यानंतर फिर्यादी आपल्या घरी गेले. रात्री ११ वाजेच्‍या सुमारास आरोपी सागर भारस्‍कर, अमोल पवार, दिनेश पवार, ओम आहेरकर, उमेश मोटे, स्‍वप्निल तांबे, आदित्‍य मिसाळ, संयम ठाकरे, प्रशांत ऊर्फ बबलू फड, राहुल सुरे, सागरची आई छाया भारस्‍कर आणि दिनेश पवारची काकू सुनिता पवार हे फिर्यादीच्‍या घरी आले. आरोपींना पाहून घाबरलेल्या फिर्यादीने घरातून पळ काढला व घरा शेजारी मैदानाकडे गेला. मात्र आरोपींनी त्‍याला मैदानात पकडले, सागर भारस्‍कर याने फिर्यादीवर चाकूने प्राण घातक हल्ला चढवत गंभीर जखमी केले. तर फिर्यादीच्‍या गल्लीत राहणाऱ्या  ओम आमले याला दिनेश व अमोल पवार यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तर इतर आरोपींनी फिर्यादी लाकडी काठीने व हाताचापटाने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, गुन्‍ह्यातील लोखंडी रॉड व चाकू हस्‍तगत करायचा आहे. आरोपींच्‍या पसार साथीदारांना अटक करायची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी न्‍यायालयाकडे केली.