बनावट विदेशी दारुची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद,२९ डिसेंबर /प्रतिनिधी:- बनावट विदेशी दारुची विक्री करणाऱ्या  दोघांना राज्य उत्‍पादन शुल्क विभागाच्‍या भरारी पथकाने बुधवारी दि.२९ रोजी पहाटे अटक केली. त्‍यांच्‍याकडून एक लाख ९२ हजारांच्‍या बनावट विदेशी दारुचे २५ बॉक्‍स, कार व दुचाकी असा सुमारे आठ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला आहे. ही कारवाई पडेगाव परिसरात पहाटे अडीच ते साडेतीन वाजेच्‍या सुमारास करण्‍यात आली.

वैभव परशुराम खरात (३२) आणि राहुल पांडूरंग वालझडे (३५, दोघे रा. त्रिमुर्ती चौक, सिडको ता.जि. नाशीक) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी दिले.

या  प्रकरणात राज्‍य उत्‍पादन शुल्क विभागाच्‍या भरारी पथकाचे जवान रविंद्र मुरडकर यांनी फिर्याद दिली.भरारी पथकाला माहिती मिळाली होती की, मिटमिटा परिसरातील पडेगाव येथील शनिमंदीरा समोर बनावट विदेशी दारुची विक्री होणार आहे. माहितीवरुन राज्य उत्‍पादन शुल्क विभागाच्‍या भरारी पथकाने सापळा रचून बनावट दारुची खरेदी-विक्री करण्‍यासाठी आलेल्या वैभव खरात आणि राहुल वालझडे या दोघांना अटक केली. तर पथकाची चाहुल लागताच आरोपींचे साथीदार सागर संतोष जैस्‍वाल (२२) आणि दत्ता नानासाहेब वारे (२६, दोघे रा. औराळा ता. कन्नड) हे पसार झाले. अटक आरोपींकडुन पोलिसांनी कार (क्रं. एमएच-०५-एएक्स-७२९५) व एक दुचाकी (क्रं. एमएच-२०-एफएम-४१२९), दोन मोबाइल तसेच कारमध्‍ये बनवाट विदेशी दारुची २५ बॉक्‍स असा सुमारे आठ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्‍त केला.या  प्रकरणात छावणी पोलिस  ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील उध्‍दव वाघ यांनी आरोपींच्‍या पसार झालेल्या साथीदारांना अटक करायची आहे. आरोपींच्‍या ताब्यातून जप्‍त करण्‍यात आलेला बनवाट दारुचा साठा त्‍यांनी कोठून व कसा आणला, कोणाला विक्री करणार होते. आरोपींकडे आणखी बनावट दारुचासाठा आहे काय याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस   कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.