पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; आरोपीस सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

वैजापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

वैजापूर ,६ मे  / प्रतिनिधी :-  पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून शेजाऱ्यावर प्राणघातक हल्ला करून त्यास जखमी केल्याप्रकरणी वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने साधी कैद भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, लखमापूर (ता.गंगापूर) येथील रामभाऊ थोरात व गणेश थोरात हे शेजारी राहत होते. रामभाऊ याचा आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गणेश थोरात याला होता.21 मार्च 2016 रोजी रामभाऊ थोरात हे हे आंघोळ करत असताना गणेश हा कोयता घेऊन त्यांच्या घरात घुसला व त्याने रामभाऊ यांच्या डोक्यात व खांद्यावर कोयत्याने सपासप वार केले.या हल्ल्यात रामभाऊ यांच्या दोन्ही हातांना ही गंभीर जखम झाली. या प्रकरणी रामभाऊ थोरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेश थोरात याच्या विरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

गंगापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वैजापूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एम.आहेर यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासले. आरोपी गणेश थोरात याने गुन्हा केल्याचे सिध्द झाल्याने न्या.आहेर यांनी त्यास सात वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांना पोलीस निरीक्षक जी.जे.जामदार व पैरवी अधिकारी बावणे यांनी सहकार्य केले.