डॉ. शिंदे खून प्रकरणाचे गूढ उकलले ,विधिसंघर्ष बालक अटकेत

तो हिटलरच, म्हणून एकदाचा संपविला! संशयिताचा जबाब

औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयाचे डॉ. राजन शिंदे यांच्या हत्येचे गूढ आठव्या  दिवशी उलगडले. त्यांच्या घरालगत असलेल्या विहिरीतून हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. शिंदे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राचा शोध घेण्यात आला. मारेकऱ्याने खून करण्यासाठी वापरलेले कपडे व शस्त्राची माहिती असा पुरावा हाती लागल्यानंतर या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.विधिसंघर्ष बालकाला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. 

काय आहे राजन शिंदे हत्या प्रकरण?

सोमवार 11 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा राहत्या घरी अत्यंत क्रूरपणे खून झाला होता. हा खून कोणी केला, याचा तपास करण्यासाठी शिंदे यांचे निकटवर्तीय, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, महाविद्यालयातील कर्मचारी अशा सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

विधिसंघर्ष बालकाने  खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच आरोपीने खून करून ते शस्त्र घराजवळीलच विहिरीत टाकल्याचे सांगितले. विहीर जुनी असल्याने आणखी सात फूट खोल पाणी असल्याचा अंदाज कर्मचाऱ्यांनी बांधला आहे. ही विहीर अनेक वर्षांपासून पडीक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. त्यामुळे त्यात गॅसही असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव , अजबसिंग जारावाल, मुकुंदवाडी पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी घटनास्थळी तळ ठोकून होते.

डॉ. शिंदे यांच्या घराजवळील विहिरीतील पाणी उपसा शनिवार 16 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरु करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. यात आणखी एक मोटार वाढवण्यात आली होती.यासाठी आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी  काम केले.अखेर शस्त्र त्या विहिरीतच सापडले. डंबेल ,चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल आदी साहित्य काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सिडको एन २ भागातील तुकोबा नगर भागात राहणारे प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा सोमवारी (११ ऑक्टोबर) पहाटे खून करण्यात आला होता. या प्रकरणात खुनाची घटना झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणात थेट पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता हे घटनास्थळी दाखल झाले होते. ते साधारणत: तीन तास घटनास्थळीच होते. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांच्यासह अन्य काही पोलिस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. शिवाय या चौकशीत विविध ठाण्याचे पोलिस निरीक्षक, सायबर पोलिसांसह गुन्हे शोध कार्यात तरबेज असलेल्या अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले होते. पोलिसांनी फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या टीमसह मानसशास्त्रीय अभ्यासकांची मदतही घेतली.

या चौकशी दरम्यान संबंधिताने खुनाची घटना झाल्यानंतर प्रा. शिंदे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या सार्वजनिक विहिरीत खून करण्यासाठी वापरलेले हत्यार फेकल्याची कबुली दिली. ही कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी विहिरीतील पाणी उपसून या विहिरीच्या गाळात हत्याराचा शोध घेण्यात आला . मारेकऱ्याने या विहिरीत गुन्ह्यात वापरलेले डंबेल्स  व चाकू हा विहिरीत फेकला होता. या महत्त्वाच्या पुराव्याचा शोध घेण्यात आला.

यातील डंबेल्सने प्रा. शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला, तर चाकूने शिंदे यांचा गळा चिरण्यात व दोन्ही हाताच्या नसा कापण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अनेक वर्षांपासून शिंदे यांच्याकडून छळ सुरू असल्याने आपण तणावात होतो. त्यातून सावरण्यासाठी ओटीटीचा सहारा घेतला. त्यातूनच त्याला ‘थ्रिलर वेब सिरीज’ पाहण्याचा नाद लागला. हत्येच्या रात्री छळ असह्य झाल्याने झोपेतच शिंदे यांची डोक्यात डंबेल्सने वार करून हत्या केली आणि गळा व नसा कापल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.