ठाकरेंच्या देव्हाऱ्यातील ‘तो’ धनुष्यबाण शिंदेंनीच गिफ्ट दिलेला!

औरंगाबाद,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील छोट्या धनुष्यबाणाची प्रतिकृती दाखविली होती. तो खरा धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच बाळासाहेबांना भेट दिला होता, अशी चर्चा आता सुरू आहे.

उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला ‘तो’ धनुष्यबाण बाळासाहेबांना तुम्ही गिफ्ट दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे यांनी हास्यमुद्रेत मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.उद्धव ठाकरे यांना काय दिले, हे सांगायची वेळ येऊ देऊ नका. आपल्याला संपत्तीचा आणि प्रॉपर्टीचा मोह कधीही नव्हता. राहणार देखील नाही, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

कोणाचीही संपत्ती, कोणाची मालमत्ता आम्हाला नको आहे. आम्ही कुठलाही दावा केला नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. प्रदीप जैस्वाल यांच्या शाही हॉटेलचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे मंत्री आणि संजय शिरसाट, रमेश बोरनारे हे आमदार उपस्थित होते.

शिवसेना आणि ठाकरे गटात नवनव्या मुद्यावरून संघर्ष वाढत चाललाय. यात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाची भर पडलीय. मातोश्रीच्या देवघरातील धनुष्यबाण एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दिला होता, असा दावा शीतल म्हात्रेंनी केलाय. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत त्यांच्या देवघरातील धनुष्यबाण दाखवला होता.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या धनुष्यबाणाची पूजा करायचे तो धनुष्यबाण पत्रकार परिषदेत दाखवला होता. उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या धनुष्यबाणावर कुंकूही दिसत होतं.उद्धव ठाकरे काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं म्हणत असले तरी आता त्यांची काळजी वाढलीय. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना एकनाथ शिंदेंनीच धनुष्यबाण दिला होता. आणि त्याचीच पूजा बाळासाहेब ठाकरे करत होते, अशी माहिती शीतल म्हात्रेंनी दिली.

धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असे शिंदे म्हणाले. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय त्यामुळे ते घाबरलेले आहेत आणि बिथरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहेत, पण आम्ही कामाने उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे तसे झाले, असे शिंदे म्हणाले.