मनेगाव येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला

वैजापूर ,२८ मार्च / प्रतिनिधी :- तालुक्यातील मनेगाव येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर विहिरीत तरंगताना आढळून आला. लाखणी येथे एका विहीरीत रविवारी दुपारी हा मृतदेह आढळला.नारायण प्रकाश लाड (32 वर्ष) रा. मनेगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

नारायण लाड हे मनेगाव ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा कर्मचारी होते.ते लाखणी येथे त्यांच्या सासरवाडीला हळदीच्या कार्यक्रमासाठी 22 मार्च रोजी गेले होते. तेव्हापासुन ते बेपत्ता झाले होते. या प्रकरणी लाड हे  बेपत्ता झाल्याची तक्रार शिऊर पोलिस  ठाण्यात दिली होती.

रविवारी लाड यांचा  मृतदेह विहीरीत तरंगतांना काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती शिऊर पोलीसांना देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन नागरीकांच्या मदतीने मृतदेह विहिरी बाहेर काढला.मृतदेह कुजल्यामुळे डॉक्टरांना पाचरण करून जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मयत लाड यांना शेती नसल्यामुळे मोलमजुरी करुन ते आपला उदरनिर्वाह करीत होते.त्यांना दहा वर्षाची मुलगी, बारा वर्षाचा मुलगा, विधवा आई, पत्नी असा परीवार आहे. गेल्या काही दिवसांपासून लाड हे आर्थिक विवंचनेमुळे नैराश्यात होते.त्यामुळे विहिरीत उडी घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. लाड यांच्यावर मनेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी शिवूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस नाईक गणेश गोरक्ष हे करीत आहेत.