महावितरणच्या अभियंत्यास जीवे मारण्याची धमकी, एकावर गुन्हा दाखल 

औरंगाबाद : वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून ग्राहकाने महावितरणच्या शाखा अभियंत्यास फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.    

कमलेश धनराज या ग्राहकाचा वीजपुरवठा वीजबिल न भरल्याने महावितरणने खंडित केला होता. त्यानंतरही हा ग्राहक परस्पर वीजपुरवठा जोडून घेत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीचे मीटर काढून नेले. त्याचा राग मनात धरून आरोपीने महावितरणच्या शिवाजीनगर शाखेचे सहायक अभियंता योगेश सोनवणे हे कार्यालयात काम करत बसले असता त्यांना फोनवरून शिवीगाळ केली तसेच शारीरिक घातपात करण्याची धमकी दिली. यानंतर सोनवणे यांनी तातडीने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. त्यावरून आरोपी कमलेश धनराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.