टास्क फोर्स समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोना रुग्णांसाठी रेमडिसीवीरचा वापर करावा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Displaying 1.jfif

औरंगाबाद  , ४ मे /प्रतिनिधी  :- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर रेमडिसीवीर या औषधाचा वापर  राज्य टास्क फोर्स समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात यावा,  असे निर्देश  जिल्ह्यातील विविध डॉक्टरांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्ष    येथे  आयोजित कोरोना टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  दिले.

            या बैठकीस महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपायुक्त (सा.प्र.) जगदिश मनियार व अन्य अधिकाऱ्यांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, डॉ.आनंद निकाळजे, डॉ.ज्योती बजाज यांच्यासह संबंधित टास्क फोर्स समिती सदस्य व आरोग्य विभागातील विविध शाखांचे प्रतिनिधी यांची या बैठकीस उपस्थिती होती.

यावेळी रेमडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नसून ते फक्त कोरोनाबाधित रुग्णाचा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत आग्रह धरु नये अश्या सूचना या बैठकी दरम्यान रेमडिसीवीर वापराबाबत करण्यात आल्या. त्याचबरोबर रेमडिसीवीर वापराबाबत जनतेचा अट्टहास आणि काही गैरसमज आहेत. याला प्रतिबंध होण्यासाठी वैद्यकीय व आरोग्य यंत्रणांनी राज्य टास्क फोर्सच्या समितीने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच रुग्णांना रेमडिसीवीर निर्देशित करावे.

गरज नसताना रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात येऊ नये. रेमडिसीवीरची अनधिकृत विक्री, औषधाचा साठा याबाबत संबंधित यंत्रणेने आपली जबाबदारी पार पाडावी. कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने रुग्णांच्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासंदर्भातील उपचार वाढवण्याची गरज असल्याचे मत डॉ.आनंज निकाळजे यांनी बैठकी दरम्यान सांगितले. त्याच प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अपवादात्मक परिस्थितीत संदिग्ध आला  किंवा रुग्णांस कोरोनाची लक्षणे आहेत पण अहवाल निगेटिव्ह आला असेल तर या परिस्थितीत निदानासाठी सीटी स्कॅन चाचणी उपयोगी पडते. तसेच यासाठी रेमडिसीवीर वापरण्याची गरज नसून रुग्णाच्या लक्षणे, प्रतिकारशक्ती, परिस्थितीनुसार औषधोपचार घेण्याची गरज असते, असे यावेळी डॉ.येळीकर यांनी आपले मत मांडले. याबरोबरच डॉ.सुंदर कुलकर्णी, डॉ.ज्योती बजाज यांच्यासह अन्य तज्ज्ञ डॉक्टर या बैठकीत उपस्थित होते.