चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम हिसकावली;आरोपीला कोठडी 

छत्रपती संभाजीनगर,३ मार्च  / प्रतिनिधी :-  जी-२० निमित्त शहरात लावण्‍यात आलेल्या लाईटिंगची देखभाल करणाऱ्या  कंत्राटी कर्मचाऱ्याच्या  वाहनाला अडवून चाकूचा धाक दाखवत १० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेली. हा प्रकार १ मार्च रोजी बाबा पेट्रोलपंपावर घडला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिसांनी तपास करुन आरोपींपैकी एकाच्‍या मुसक्या आवळल्या.मोहम्मद आमेर खान मोहम्मद सलीम खान (३२, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी दिले.

आरोपींकडून गुन्‍ह्यातील रक्कम हस्‍तगत करायची आहे. गुन्‍ह्यात वापरलेला चाकू आणि दुचाकी जप्‍त करुन आरोपीच्‍या पसार साथीदाराला अटक करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची‍ विनंती सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी न्‍यायालयाकडे केली होती.

या प्रकरणात अनिकेत बाळु ढावरे (२४, रा. आंबेडकरनगर, पुणे, ह.मु.  मध्‍यवर्ती बसस्‍थानका समोरील अर्थव लॉज औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, जी-२० परिषदेनिमीत्त शहराच्‍या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या  लाईटिंगचे काम पुण्‍यात राहणाऱ्या  युवराज शिंदे यांनी घेतलेले आहे. शिंदे यांच्‍याकडे फिर्यादी हे इलेक्ट्रीशीयन म्हणुन काम करतात. त्‍यांना शहरातील लावलेल्या लाईटिंगच्‍या देखभाल व दुरुस्‍तीसाठी पाठविण्‍यात आले होते. त्‍यानूसार फिर्यादी हे आपल्या दोन साथीदारांसह शहरात आले होते. १ मार्च रोजी मध्‍यरात्रीनंतर दीड वाजेच्‍या सुमारास फिर्यादी हे छोटा हत्ती वाहनामध्‍ये (क्रं. एमएच-२२-एए-०८२०) दोन साथीदारांसह लाईटिंगची पाहणी करीत होते. ते बाबा पेट्राल पंप चौकात पोहचले असता अचानक एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्‍यांच्‍या वाहनासमोर दुचाकी अडवी लावली. व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्‍या खिशातील १० हजार ५०० रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेत तेथून धूम ठोकली.या  प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपींपैकी एक मोहम्मद आमेर याला अटक केली. व त्‍याच्‍याकडून दोन हजार रुपये जप्‍त करण्यात आले आहेत.