शिवना नदीपात्रातून रात्रीतून अवैध वाळू उपसा ; अवैध वाळू वाहतूक थांबविण्याची झोलेगाव ग्रामपंचायतची मागणी

वैजापूर ,३ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील शिवना नदी पात्रातील झोलेगाव वाळू पट्टयातून शासनाची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. जवळपास 20 वाहनाद्वारे विशेषतः रात्री वाळूची चोरी सुरू आहे.

विशेष म्हणजे 17 जानेवारीला वाळुची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चार सदस्यीय पथक नेमण्यात आले आहे. पथकात मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस कर्मचारी असे चार सदस्यीय पथक नेमण्यात आले आहे. हे पथक तीन पाळ्यात नेमण्यात आले आहे. पथक नेमण्यात आल्यानंतर सुध्दा वाळूपट्टयातून वाळूचा बेसुमार उपसा झाला आहे. मात्र पथकाने एकही कारवाई केली नाही. मग ही वाळू गेली कुठे..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वाळूपट्टयात मोठे मोठे खड्डे पडले असून वाळू चोरीला गेली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.अद्याप पथकाने एकाही वाहनांवर कारवाई केली नाही.त्यामुळे महसूल व पोलिस यांचा या वाळू वाहतुकीला पाठींबा आहे का ..? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.अधिकारी व कर्मचारी यांच्या हप्ते खोरीमुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलास अक्षरशः चुना लावला जात आहे.

ग्रामपंचायत झोलेगाव यांनी सर्व वरीष्ठ महसुल व पोलीस अधिकारी यांना अवैध वाळू वाहतूक थांबविणे बाबत कळविले आहे.मात्र काहीही उपयोग झाला नाही. शिवना नदी पात्रातील झोलेगाव शिवारात वाळु तस्करीचा गोरख धंदा मोठ्याप्रमाणात फोफावला आहे.त्यास रक्षणाची जबाबदारी असणारे महसुल व पोलीस प्रशासन अभय देत आहे.त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.या प्रकरणात संबंधित महसुल व पोलीस कर्मचारी यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.कारण वरकमाईच्या नादात शासनाचे नुकसान होत असून वाळु तस्करांचे मनोबल वाढले आहे.महसुल व पोलीस प्रशासनात देखील काही प्रामाणिक कर्मचारी आहेत. परंतू त्यांचेवर कारवाई न करण्यासाठी वरीष्ठांचा दबाव वाढत आहे

वाळु  उपशामुळे परीसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.तसेच स्थानिकांच्या शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.अवैध वाळु वाहतूकीमुळे रस्ते खराब होऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खड्ड्यात जात आहे.वाळु वाहतूक होणाऱ्या झोलेगाव या ठीकाणी महसुल अधिकारी व पत्रकार यांच्या वर प्राण घातक हल्ले झाले आहेत.वाळु उपशाबाबत अनेक तक्रारी झाल्या.कारवाई मात्र झाली नाही.यात मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याची चर्चा आहे.याबाबत महसुल व पोलीस विभाग एकमेकांकडे बोट दाखवून मोकळे होत आहे.त्यामुळे वाळु माफीयाचे अधिक फोफावले आहे.गुरूवारी झोलेगाव ग्रामपंचायतच्यावतीने उपजिल्हाधिकारी व सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अवैध वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी केली आहे.