वैजापूर येथे प्रतिबंधीत पान मसाला व तंबाखूसह एकाला पकडले ; 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त वाहतूक पोलिसांची कारवाई

वैजापूर ,८ डिसेंबर /प्रतिनिधी :- येवल्याहून वैजापूरकडे मोटारसायकलवर प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू घेऊन येणाऱ्या येवला येथील तरुणास वाहतूक सेवेच्या पोलिसांनी बुधवारी दुपारी वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ पकडले.शेख दानिश शेख रईस असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याकडून 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशानुसार वैजापूर हद्दीतील अवैध धंद्याची माहिती घेणे तसेच  मोटार वाहन केसेस करण्याची विशेष मोहीम व पेट्रोलिंग करणे कामी औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक बी.एम.जमघडे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक संतोष राठोड, विक्रम बागल हे वैजापूर आले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास वैजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनांची तपासणी करून केसेस करीत असतांना येवल्याहून एक इसम प्रतिबंधित पान मसाला व तंबाखू घेऊन वैजापूरकडे येत असल्याची माहिती त्यांना मिळाली त्यावरून ते येवला रोडवरील विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ थांबले व वाहन तपासणी करीत असताना शेख दानिश शेख रईस (वय 22 वर्ष रा. मोमीनपुरा, येवला ) हा तरुण काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर (क्र. एम.एच.15, ई. यु. 0602) गोणी घेऊन येत असताना दिसला त्यास थांबवून चौकशी केली असता त्याच्या गोणीत प्रतिबंधित हिरा पानमसाला, रॉयल तंबाखू, राजनिवास पानमसाला, विमल पानमसाला व जाफराणी जर्दा मिळून आला.  या प्रकरणी वाहतूक पोलिस शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बी.एम.जगदाळे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.