कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजप विजयी

चिंचवडमध्ये झेंडा भाजपचाच, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय

पुणे,२ मार्च  / प्रतिनिधी :-चिंचवडमध्ये भाजपने मुसंडी मारत तिरंगी लढतीत भाजपचाच झेंडा फडकवला आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे निवडणूक पार पडली. शिवाय, उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाल्यामुळे ही तिरंगी लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये अश्विनी जगताप यांचा ३६, ०९१ मतांनी मोठा विजय झाला.

“मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.

संपूर्ण मतमोजणीत अश्विनी जगताप यांना एकुण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली असून, नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली आहेत. तर राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मतं मिळाली आहेत.

कसब्यातील प्रतिष्ठेच्या निवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी

पुणे: कसब्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष साजरा केला जात आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ५०. ६ टक्के मतदान झालं होतं. म्हणजेच, २ लाख ७५ हजार ६७९ मतदारांपैकी १ लाख ३८ हजार ०१८ मतदारांनी मतदान केलं होतं.

भाजपच्या ताब्यात असलेले कसबा आणि चिंचवड मतदारसंघ आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झाले होते. त्यासाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली होती. तेव्हापासूनच पुणे पोटनिवडणूक चर्चेत होती. पुणे पोटनिवडणूक चुरशीची होणार हे जवळपास निश्चितच होतं.

कसब्यात प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला. या रोड शोनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला होता. तर दुसरीकडे धंगेकरांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनेही सर्व ताकद पणाला लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंचा रोड शोदेखील झाला होता. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी रोड शो, पदयात्रा, शक्तीप्रदर्शन आणि घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला होता.