बांधकामावरुन गज चोरतांना शेतमालकाने तिघांना रंगेहाथ पकडले;आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

औरंगाबाद,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  शेतात सुरु असलेल्या गोडाऊनच्‍या बांधकामावरुन गज चोरतांना शेतमालकाने तिघांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. विशेष म्हणजे चोरट्यांकडून एक लोडींगरिक्षा (क्रं. एमएच-२०-डीई-३८९१) देखील जप्‍त केली. ही घटना रविवारी दि.२६ पहाटे अडीच ते तीन वाजेच्‍या सुमारास करोडी शिवारात घडली.

गणेश बालाजी कलींदर (२२, रा. वडगाकव कोल्हाटी), किशोर सोमनाथ थोरात (२६, रा. बाजाजनगर, वाळुज) आणि संदिप नंदु शिंदे (२३, रा. वडगाव कोल्हाटी) अशी आरोपींनी नावे आहेत. आरोपींना सोमवारपर्यंत दि.२७ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एम. भांडे यांनी दिले.

करोडी येथे राहणारे सोमीनाथ रावसाहेब गोल्हार (२७) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीच्‍या गट क्रं.६४ येथील करोडी शिवारातील शेतात गोडाऊनचे बांधकाम सुरु आहे. बांधकामाच्‍या ठीकाणी वॉचमन म्हणुन बाबासाहेब सोनवणे यांना ठेवण्‍यात आले आहे. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे गोडाऊन बांधकावरुन तीन चोर लोखंडी गज चोरुन नेत असतांना वॉचमन सोनवणे यांच्‍या निदर्शनास आले. त्‍यांनी तात्काळी ही बाब सेामीनाथ गोल्हार यांना फोन करुन सांगितली. फिर्यादी हे चुलत भाऊ व दोन मीत्रांसह कारने बांधकामाच्‍या ठीकाणी पोहचले. त्‍यांनी चोरी करणाऱ्या तिघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले व पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सराकरी वकील समीर बेदरे यांनी गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग होता काय, आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.