रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार,सहा आरोपींचा नियमित जामीन सशर्त मंजूर ,एकाचा फेटाळला   

औरंगाबाद,७ मे /प्रतिनिधी

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्ररणी सातवा आरोपी साईनाथ अण्णा वाहुळ (३२, रा. रामनगर) याने सादर केलेला नियमित  जामीन अर्ज प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी शुक्रवारी दि.७ फेटाळला.अन्य सहा आरोपींचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला. 

रेमडीसीवीर इंजेकशनचा काळा बाजार करणारे रॅकेट गुन्हे शाखेने २६ एप्रिल रोजी  उघडकीस आणले होते. या प्रकरणात सात आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात पैकी सहा आरोपींना न्‍यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर सातवा आरोपी साईनाथ वाहूळ याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले होते. दरम्यान उर्वरित सहा आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता न्यायालयाने पोलीसांची मागणी फेटाळून  आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.     

त्‍यानंतर दिनेश कान्हु नवगीरे,  रवि रोहिदास डोंगरे ,  संदीप सुखदेव रगडे , प्रविण शिवनाथ बोर्डे , नरेंद्र मुरलीधर साबळे  आणि  अफरोज खान इकबाल खान या सहा  आरोपींनी नियमित  जामीनासाठी अर्ज सादर केला असता न्‍यायालयाने त्यांचा  सशर्त जामीन मंजूर केला.

 आरोपी साईनाथ वाहुळ याने नुकताच नियमित जामीनसाठी अर्ज सादर केला असता, न्‍यायालयाने त्‍याचा जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.