नगर-औरंगाबाद गोलवाडी उड्डाणपूलाचा मार्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू

औरंगाबाद,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  नगर-औरंगाबाद गोलवाडी उड्डाणपूलाचा मार्ग १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे निवेदन गुरुवारी दि.९ झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खंडपीठात देण्‍यात आले. त्‍यावर न्‍या. रविंद्र घुगे आणि न्‍या. संजय देशमुख यांच्‍या पीठाने उड्डाणपूल त्‍यातारखेलाच सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर शिवाजीनगर भूयारीमार्गातील त्‍या दोन खासगी मालमत्तांचे मुल्यांकन करण्‍यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भूसंपादन विभागाकडे देण्‍यात आल्याचे निवेदन महापालिकेच्‍या वतीने खंडपीठात देण्‍यात आले. याचिकेवर पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शहरातील विविध रस्ते, पुलांच्या कामांच्या संदर्भाने ॲड. रुपेश जैस्वाल यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी  खंडपीठापुढे झाली. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद-नगर छावणी उड्डाणपुलाची एक बाजू रहदारीसाठी १९ जानेवारी रोजी सुरु करण्‍यात आली. तर दुसरी बाजू १५ फेब्रुवारीपर्यंत सुरु करण्‍यात येईल असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. तर आज झालेल्या सुनावणीत सार्वजनिक बांधकाम विभागाने गोलवाडी उड्डाणपुलाची नगर-औरंगाबाद बाजू १५ फेब्रुवारी रोजीच सुरु होईल असे निवेदन केले. तर शिवाजीनगर भूयारीमार्गातील त्‍या दोन खासगी मालमत्तांचे २४ लाख ८५ हजार ३८९ रुपये असे मुल्यांकन करण्‍यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भूसंपादन विभागाकडे देण्‍यात आल्याचे निवेदन महापालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले.

या प्रकरणी शासनातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. सुजित कार्लेकर, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. नावंदर, ॲड. रूपेश जैस्वाल आदींनी काम पाहिले.