वन मजुराच्‍या अंगावर टॅक्‍टर घालून जीवे ठार मारण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या ट्रॅक्‍टर चालकाला विविध कलमांन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,६ एप्रिल / प्रतिनिधी :- राखीव वन विभागातून वाळू चोरुन नेण्‍यास विरोध केल्याने वन मजुराच्‍या अंगावर टॅक्‍टर घालून जीवे ठार मारण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या  ट्रॅक्‍टर चालकाला विविध कलमांअन्‍वये एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.डी. लोखंडी यांनी बुधवारी दि.६ एप्रिल रोजी दिले. सागर मधुकर गायकवाड (२६, रा. मकरणपुर ता. कन्नड) असे आरोपी ट्रक्टर चालकाचे नाव आहे.

या प्रकरणात वनमजूर पंडित दत्तू भडाईत (४५, रा. चापणेर, ता. कन्नड) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, फिर्यादी हे चापानेर येथील बोलटेक या राखीव वन विभागात कर्तव्‍यावर होते. २० जानेवारी २०१९ रोजी फिर्यादी हे बोलटेक राखीव वन विभागात गस्‍त घालत होते. दुपारी चार वाजेच्‍या सुमारास वन विभागाच्‍या क्षेत्रात काही लोक ट्रॅक्‍टर (क्रं. एमएच-२८-ए-८३९३) मध्‍ये वाळु भरतांना दिसले. त्‍याचवेळी ट्रॅक्‍टरचालकाला देखील फिर्यादीची चाहूल लागली. त्‍यामुळे ट्रॅक्‍टर चालकाने ट्रॅक्‍टर घेवून धूम ठोकण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र फिर्यादी ट्रॅक्‍टरला समोर जावून उभे राहिले. त्‍यांनी चालकाला याचा जाब विचारला असता मंदीरासाठी वाळु नेत असल्याने याबाबत कोणाला काय सांगायचे असे उत्तर त्‍याने दिले. फिर्यादीने ही बाब वरिष्‍ठांना फोन करुन सांगत असताना आरोपी चालकाने ट्रॅक्‍टर सुरु केला, त्‍यावर फिर्यादीने त्‍याला अडवून जावू नको असा इशारा केला. मात्र चालकाने ज्याला फोन लावायचा ला, तु बाजूला सरक अन्‍य‍था तुला उडवून देईन असे म्हणत फिर्यादीच्‍या अंगावर ट्रॅक्‍टर घातला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले.या प्रकरणात कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात पोलिस निरीक्षक एस.वी. गाडे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सचिन सूर्यवंशी  यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी ट्रॅक्‍टर चालक सागर गायकवाड याला दोषी ठरवून भादंवी कलम ३५३ आणि कलम ३३२ अन्वये एक वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.