खूनाच्‍या गुन्‍ह्यात ६ आरोपींना जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपयांचा दंड

औरंगाबाद,२७ जानेवारी / प्रतिनिधी :-शेतातून टॅक्‍ट्रर नेल्‍याच्‍या कारणावरुन भावकीतील बाप लेकाला बेदम मारहाण करण्‍यात आली. ही घटना २६ जून २०२१ रोजी रात्री आठ वाजेच्‍यासुमारास घारदोन (ता.जि. औरंगाबाद) येथे घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माणिकराव नवपुते (६५) यांचा उपचारा दरम्यान मृत्‍यू झाला होता. प्रकरणात १२ जणांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्‍यातील सहा आरोपींना खूनाच्‍या गुन्‍ह्यात जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपयांचा दंडाशी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्‍ही.एस. कुलकर्णी यांनी ठोठावली.तर उर्वरित सहा जणांनी सबळ पुराव्‍या अभावी निर्दोष मुक्तता करण्‍यात आली.

रवि ऊर्फ रविंद्र श्रीराम नवपुते (२२), अमोल बद्रीनाथ नवपुते (२१), हरि उर्फ हरिभाऊ बाबुराव नवपुते (२१), भास्‍कर भुंजगराव नवपुते (४८), राम ऊर्फ रामभाऊ बाबुराव नवपुते (२५) आणि श्रीराम जनार्धन नवपुते (४८, सर्व रा. घारदोन ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात मयत माणिकराव नवपुते यांचा मुलगा गोरख नवपुते (३८) याने फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीची घारदोन येथील शेतात जाण्‍यासाठी फिर्यादीचे चुलत भाऊ श्रीराम नवपुते व भास्‍कर नवपुतेयांच्‍या शेतातून रस्‍ता आहे. २६ जून रोजी सकाळी फिर्यादी व त्‍यांचा भाऊ विक्रम असे दोघे शेतात रोटा मारत असतांना टॅक्‍ट्रर चालक दिपक नवपुते याला रवि नवपुते याने फोन करुन तु माझ्या शेतातून टॅक्‍ट्रर का घेवून गेला म्हणुन शिवीगाळ केली होती.

रात्री आठ वाजेच्‍या सुमारास वरील आरोपी हे साथीदारांसह विक्रमच्‍या घरी आले. त्‍यांनी विक्रमला शिवीगाळ करुन लोखंडी शिवळ्याने त्‍याचे डोके फोडले. आवाज ऐकून फिर्यादी, माणिकराव नवपुते हे भांडण सोडविण्‍यासाठी गेले असता आरोपींनी त्‍यांना देखील लोखंडी गजाने, शिळाने मारहाण जबर मारहाण केली. उपचारा दरम्यान जखमी माणिकराव यांचा मृत्‍यू झाला. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक व्‍ही.आर. पा‍टील यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि प्रत्‍येकी एक हजार रुपये दंड, कलम ३०७ अन्‍वये ५ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी एक हजर रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.