वैजापूर तालुक्यात जिल्हा परिषद प्रभाग रचनेनंतर आता आरक्षणाकडे लक्ष ; इच्छुकांचे देव पाण्यात

वैजापूर ,४ जून  /प्रतिनिधी :- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवारी जिल्हा परिषदेच्या गटांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यात एक गट व दोन गणांची आणखी भर पडली असून गटांची संख्या नऊ तर गणांची संख्या अठरा झाली आहे.

तालुक्यात गट आणि गणांच्या भौगोलिक रचनेत बदल करण्यात आला आहे. लोकसंख्येच्या निकषानूसार हे बदल करण्यात आले असून अनेक सदस्यांच्या विद्यमान गटांचे अस्तित्व संपले आहे. गट आणि गणांची नव्याने निर्मिती झाल्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता गट आणि गणांच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. आपला गट आणि गण आरक्षित होऊ नये यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

वैजापूर तालुक्यात गेल्या पंचवार्षिकला 1) महालगाव (सर्वसाधारण), 2) घायगांव (सर्वसाधारण), 3) वांजरगाव (सर्वसाधारण), 4) लासुरगाव (महिला राखीव), 5) बोरसर (महिला राखीव) 6) वाकला (अनुसूचित जाती), 7) शिवूर (अनुसूचित जमाती), 8) सवंदगाव (ओबीसी) असे एकूण आठ जिल्हा परिषद गट होते.यावर्षी नव्याने झालेल्या गट फेरचनेत एक गट वाढला असून गटांची संख्या नऊ झाली आहे. धोंदलगाव, खंडाळा,लाडगाव व चोरवाघलगाव हे चार नवीन गट तयार झाले आहेत तर वाकला, शिवूर, सवंदगांव, लासुरगांव व महालगांव हे पाच अन्य गट  आहेत. बोरसर, घायगांव व वांजरगाव हे गट वगळण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेचे 9 गट व पंचायत समितीचे 18 गण तयार झाले असून गट आणि गणांचा आकार छोटा झाला आहे.

गट व गणांचा आकार कमी झाला असला तरी उमेदवारीचे गणित मात्र आरक्षणावर अवलंबून राहणार आहे. यंदा देखील रोटेशननुसार आरक्षण निघणार की नवीन नवीन गटात नव्याने आरक्षण काढणार याविषयी राजकीय मंडळीत चर्चा आहे.गत पंचवार्षिकचा विचार केल्यास लासुरगांव व बोरसर हे दोन गट सर्वसाधारण महिलांसाठी तर वाकला व शिऊर हे दोन गट अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी राखीव होते. महालगाव, घायगाव व वांजरगाव हे तीन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होते.सवदगाव गट हा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होता.आता गट आणि गणांची प्रभाग रचना जाहीर झाली असून त्यावर 8 जूनपर्यंत हरकती दाखल करता येतील.त्यानंतर 27 जूनला गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आरक्षणाचा विषय येणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्या मंडळीना मात्र आरक्षण नव्या पध्दतीने की जुन्या रोटेशननुसार याचीच चिंता आहे त्यामुळे त्यांचे लक्ष आता आरक्षणाकडे राहणार आहे. गट आणि गण आरक्षित झाल्यास इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरणार असल्याने आपला गट किंवा गण आरक्षित होऊ नये यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.