पत्‍नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या जीवलग मित्राचा खून,गुड्डूला जन्मठेप

औरंगाबाद ,१६ एप्रिल  /प्रतिनिधी :- पत्‍नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या  जीवलग मित्राचा खून करुन त्‍याच्‍या शरिराचे १७ तुकडे करुन ते घरा शेजारील एका बोअरवेल मध्‍ये टाकणाऱ्या  नराधमाला जन्‍मठेप आणि विविध कलमांखाली अडीच हजारांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांनी शनिवारी ठोठावली. साहिल ऊर्फ गुड्डू अफसर शेख (२८, रा. खादगाव ता. पैठण) असे मित्राचा खून करणाऱ्या  नराधमाचे नाव आहे.

या प्रकरणात मयत मुजीम शेख नबी शेख (२५, रा. खादगाव ता. पैठण) याचे वडील शेख नबी शेख शब्बीर (४५) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १० ऑक्‍टोबर २०१७ रोजी मुजीम हा तंबाखूची पुडी  घेवून येतो म्हणत घराबाहेर गेला होता. मात्र तो न परतल्याने मुजीमची आई रुक्साना हिने दिलेल्या तक्रारीवरुन १० ऑक्टोबर २०१७ रोजी पाचोड पोलिस ठाण्‍यात मिसींगची तक्रार नोंदविण्‍यात आली होती. दरम्यान मयत मुजीमचे आणि आरोपी साहिल ऊर्फ गुड्डूच्‍या पत्‍नीचे अनैतिक संबंध होते. व १० ऑक्‍टोबर २०१७ रोजी मुजीम हा आरोपी साहिल ऊर्फ गुड्डूच्‍या टपरीवर बसलेला होता अशी माहिती फिर्यादीला मिळाली. १५ ऑक्‍टोबर २०१७ रोजी फिर्यादीने मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली व आरोपीवर संशय व्‍यक्त केला. त्‍यानूसार पोलिसांनी आरोपीसह त्‍याच्‍या दोन भावांना ३१ जानेवारी २०१८ रोजी अटक केली. मात्र पुरावे न मिळाल्याने न्‍यायालयाने त्‍यांना जामीन दिला.

गुन्‍ह्याचा तपास सुरु असतांना तब्बल दोन महिन्‍यांनी म्हणजे २८ मार्च २०१८ रोजी आरोपीच्‍या घरा जवळील बोअरवेल परिसरात दुर्गंध येत असल्याची माहिती पोलिसांच्‍या कानी पडली. पोलिसांनी महसुल विभागाला संपर्क साधला. त्‍यानंतर बोअरवेल जेसीबीच्‍या सहाय्याने खोदन्‍याचे काम सुरु झाले. २० ते २५ फुटाच्‍या अंतरावर बोअरवेलच्‍या पाईपमध्‍ये शरिराचे सडलेल्या अवस्‍थेत तब्बल १७ तुकडे मिळाले. त्‍या सोबत एक मोबाइल आणि शर्ट देखील पोलिसांना सापडले. मोबाइल व शर्ट हे मुजीमचे असल्याचे फिर्यादीने ओळखले. त्‍याच ठीकाणी मयताचे शवविच्‍छेदन करण्‍याता आले. मयताच्‍या आई-वडीलांची डीएनऐ तपसणी करण्यात आली असता, ते तुकडे फिर्यादीच्‍या मुलाचेच असल्याचे सिध्‍द झाले. प्रकरणात आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू सह त्‍याच्‍या दोन भावांवर भादंवी कलम ३०२ अन्‍वये पाचोड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करुन त्‍यांना अटक करण्‍यात आली.

तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक महेश आंधळे, हवालदार जे.डब्लू. कनसे उपनिरीक्षक जे.आर. खरड यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले.या  प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतिष मुंडवाडकर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्‍यात आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू याची पत्‍नीची साक्ष महत्‍वाची ठरली. त्‍यात आरोपीच्‍या पत्‍नीने मयत व आपल्यात अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले. तसेच घटनेच्‍या दिवशी मयत व आरोपी हे सोबत असल्याचे तिने सांगितले. याशिवाय वैद्यकिय पुरावा आणि इतर दोन सक्षीदारांची साक्ष महत्‍वाची ठरली.

दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी साहिल ऊर्फ गुड्डू शेख याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्‍वये जन्‍मठेप आणि दोन हजार रुपये दंड, कलम २०१ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणुन सहायक फौजदार एस.एन. सातदीवे आणि हवालदार भगवान जाधव यांनी काम पाहिले.