तरुणाच्‍या ताब्यातून कट्टा आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :-गावठी घेवून फिरणाऱ्याला सातारा पोलिसांनी सोमवारी दि.१६ रात्री अटक केली. चेतन गणेश झळके (२३, रा. वळदगाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून त्‍याच्‍या ताब्यातून कट्टा आणि दोन जिवंत काडतूस हस्तगत करण्‍यात आले आहेत. आरोपी झळके याला बुधवारपर्यंत दि.१८ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद साजिदुज्जमॉं यांनी मंगळवारी दि.१७ दिले.

सातारा पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक देवीदास शेवाळे हे सोमवारी दि.१६ सायंकाळी आपल्या पथकासह परिसरात गस्‍त घालत होते. त्‍यावेळी वळदगाव शिवार येथे एक तरुण गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती शेवाळे यांना मिळाली. त्‍याआधारे पोलिसांनी छापा मारुन गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या. त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍या ताब्यातून एक कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्‍त करण्‍यात आले. त्‍याची चौकशी केली असता त्‍याने कट्टा व काडतूस अक्षय खंडागळे (गिरीराज सो. नगर हायवे, वळदगाव शिवार) याच्‍याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. तसेच खंडागळे याने कट्टा आणि काडतूस पिंटू नावाच्‍या व्‍यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली.या प्रकरणात सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

आरोपीला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. कट्टा घेवून फिरण्‍याचा उद्देश काय होता, आणखी कट्टे लपवून ठेवले आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी न्‍यायालयाकडे केली.