स्वत:ची बलस्थाने ओळखायला शिका- डॉ.शिल्पा तोतला

‘डीआयटीएमएस’मध्ये ‘इंडक्शन’ समारंभ उत्साहात

औरंगाबाद – बदलत्या काळानुरूप करिअरची क्षीतीजे मोठ्या प्रमाणावर विस्तारत चालली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात नव नवीन संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेऊन तसेच स्वत:ची बलस्थाने ओळखायला शिकले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिध्दी उद्योजिका तथा आरोग्य सल्लागार डॉ.शिल्पा तोतला यांनी केले.

‘डीआयटीएमएस’च्या पदवी परिचय समारंभाचे दीपप्रज्वलन करून उद्‌घाटन करताना डॉ.शिल्पा तोतला, डॉ.अनुया चांदोरकर, प्रा.सबिहा शेख आदी.

देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज (डीआयटीएमएस) महाविद्यालयात बीबीए, बीसीए, बीसीएस विद्याशाखांमध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘डीआयटीएमएस स्टुडंट फोरम’ यांच्यावतीने देवगिरी महाविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर सभागृहात नुकताच पदवी परिचय समारंभ (इंडक्शन) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन डॉ.शिल्पा तोतला यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘डीआयटीएमएस’च्या संचालिका डॉ.अनुया चांदोरकर, दामिनी पथकाच्या प्रमुख आम्रपाली तायडे, निर्मला निंबोरे,  प्रा.सबिहा शेख, प्रा.रमण करडे, डॉ.पल्लवी भालेराव, प्रा.राजेंद्र मोतिगे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.शिल्पा तोतला म्हणाल्या की, अभ्यासात सातत्य असले की हमखास यश मिळते. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना एकाग्रता ही खूप महत्वाची असते. यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम, योगा करून आपले शरीर मानसिकदृष्ट्या चांगले ठेवले पाहिजे.

डॉ.अनुया चांदोरकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी आमचे महाविद्यालय नेहमीच पुढाकार घेत आले आहे. कविद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविण्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तर  प्रा.सबिहा शेख यांनी आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व विशद करून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावे असे सांगितले.

प्रा.रमन करडे यांनी व्यावसायिक कौशल्ये व उद्योजकता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर दामिनी पथकाच्या प्रमुख आम्रपाली तायडे व निर्मला निंबोरे यांनी विद्यार्थ्यांना कायद्यातील विविध कलामांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ‘स्टुडंट फोरम’चे सदस्य सत्यजीत खामणकर यांनी तर आभार प्रा.डॉ.उमेशकुमार मालपानी यांनी मानले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘डीआयटीएमएस’च्या महाविद्यालयाच्या एन.एस.एस. व क्रीडा विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची महाविद्यालय ते वेदांतनगर, बन्सीलालनगर, कोकणवाडी, रचनाकार कॉलनी या भागात रॅली काढण्यात आली. या रॅलीची सांगता वेदांतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाने झाली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.