विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून जी-२० पूर्वतयारी बाबतचा आढावा

औरंगाबाद,१७ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या बैठका व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज आढावा घेतला. जी-20 बैठकांच्या निमित्ताने सुरू असलेली कामे तीन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया आदी उपस्थित होते.

जी-20 राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजनाने औरंगाबादकरांना एक संधी मिळाली आहे. त्यासाठी सुक्ष्म नियोजन महत्वाचे आहे. जी-20 बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील तसेच शहरातील संपूर्ण रस्ते, रस्त्यांची स्वच्छता, रस्ता दुरूस्ती, रस्ता दुभाजकांची कामे, उड्डाणपुलांवरील रस्ता दुभाजक, झाडांची निगा तसेच परिषदेच्या निमित्ताने आवश्यक ती सर्व कामे तीन आठवड्याच्या आत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. कामाबाबत कोणत्याही प्रकारे हयगय सहन केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात या परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या अतिथींचे स्वागत, बैठकांच्या वेळी वाहतूक व्यवस्था, आपले शहर स्वच्छ व सुंदर राखून जगातील प्रमुख देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे. आपण सर्व मिळून या परिषदेच्या आयोजनात सहभागी होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद येथे होणाऱ्या जी-20 परिषदेच्या नियोजनाविषयी तसेच सुरू असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्री.चौधरी यांनीही जी-20 संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

बैठकीस महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका प्रशासन, परिवहन विभाग, ऊर्जा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.