बलात्काराचा गुन्हा ,आरोपी महेबूब शेख याला अटक का करण्यात आली नाही ?-औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद ,१२ एप्रिल / प्रतिनिधी 

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील राष्ट्रवादीचा युवक कॉंग्रसचा प्रदेशाध्यक्ष तथा आरोपी महेबूब शेख याला अटक का करण्यात आली नाही?, अशी विचारणा करित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रविंद्र घुगे आणि न्या. बी.यू. देबडवार यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. तसेच तपासअधिकार्यांना गुन्ह्याचा तपास कसा करावा याचे धडे देण्याची गरज असल्याचे निरीक्षण देखील खंडपीठाने नोंदविले आहेत.

प्रकरणात पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन 26 डिसेंबर 2020 रोजी महेबूब शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी आरोपी महेबूब शेखला अटक केली नाही. त्याविरोधात पीडितेने जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांच्या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. आरोपी हा राजकीय व्यक्ती असल्याने गुन्हा दाखल होउनही तो राजकीय बळाचा वापर करुन अटक टाळत आहे. तसेच पोलीस ही त्याला मदत करुन पाठीशी घालत असल्याचे पीडितेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

याचिकेच्या सुनावणी वेळी अॅड. देशमुख यांनी न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिले की, केेंद्रिय गृह मंत्रालयाच्या परिपत्रका नुसार, तपास दोन महिन्यात होणे आवश्यक होता, ते झाले नाही. तसेच पूर्वीच्या तपासअधिकारी अश्लेषा पाटील यांच्याकडून अचानक तपास काढून घेण्यात आला. आरोपीच्या म्हणण्या नुसार, तो घटनेच्या दिवशी औरंगाबादेत नव्हता, तो त्याच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर होता. त्यानूसार त्याची वरिष्ठ नेते खासदार, अमादार राजकीय व्यक्ती यांची जवळीक असल्याने निदर्शनास आणून दिले. बरोबरच आरोपीस अटक न करता पोलिसांनी बी समरी रिपोर्ट दाखल केल्याचे देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

याचिकेच्या सुनावणीअंती न्यायालयाने प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी चुकीच्या पध्दतीने केलेल्या तपासावर ताशेरे ओढले. तसेच आरोपी हा राजकीय व्यक्ती असल्यानेच तपास अधिकार्यांनी त्याला पाठीशी घातले अशी नाराजी देखील व्यक्त केली. तपासअधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ यांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात कसा तपास केला पाहिजे याचे धडे देणे गरजेचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिकेत, पीडितेच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अभिजित आव्हाड आणि अॅड. केतन पोटे यांनी सहकार्य केले.