इस्रोच्या निबंध स्पर्धेत औरंगाबादची आर्या देशात सातवी

जिल्हाधिकाऱ्यांकडून आर्याचे कौतूक व गौरव

औरंगाबाद, दि.5 :- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘इस्रो सायबरस्पेस कॉम्पिटिशन 2020’ निबंध स्पर्धेचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात केले होते. या स्पर्धेत औरंगाबादच्या वूडरिज शाळेच्या आर्या वैष्णव हिने देशात सातवा क्रमांक पटकावला. यासंबंधीची माहिती इस्त्रोने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पत्राव्दारे कळविली.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी कौतुकास पात्र असलेल्या आर्यास जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून तिच्या या कामगिरीचे कौतूक करून तिचा गौरव केला. शिवाय इस्रोसारख्या संस्थेकडून जिल्ह्यातील आर्याचा गौरव होणे जिल्ह्यासाठी देखील भूषणावह बाब असल्याचे सांगत आर्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर लेखन कौशल्यातून सर्वांगीण विकास साध्य करता येऊ शकतो. त्यादृष्टीने सर्व शिक्षक, पालक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही उपस्थित शिक्षक, पालकांना केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, शिक्षणाधिकारी डॉ.बी.बी. चव्हाण, शाळेचे प्राचार्य, मकरंद वैष्णव, श्रीमती वैष्णव आदींची उपस्थिती होती.