औरंगाबाद जिल्हा न्यायालयातील वकिलांचे  पेनडाऊन आंदोलन मागे

औरंगाबाद,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-  जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेले एक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वकिलांचा विनाकारण वारंवार अपमान करीत असतात, त्यांच्या या अवमानाच्या कार्यपध्दतीच्या विरोधात व या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांची बदली व्हावी म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी पेनडाऊन आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन आज मागे घेण्यात आले.

जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष कैलास बगनावत आणि सचिव अ‍ॅड. योगेश फाटके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार, एका प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्‍याविरोधात यांच्या विरोधात अनेक महिला व पुरुष वकिलांनी जिल्हा वकिल संघाकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीवर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य पोर्चच्या तळमजल्यावर वकिल संघाने विशेष सर्वसाधारण सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. कैलास बगनावत होते. सभेमध्ये अनेक वकिलांनी संबंधीत न्‍यायाधीशांच्‍या कामकाजाबद्दल असंतोष आणि तीव्र आक्षेप नोंदवत त्‍यांच्‍या कार्यपध्दतीवर चर्चा करण्यात आली. सभेचे सुत्रसंचालन वकील संघाचे सचिव अ‍ॅड. योगेश फाटके यांनी केले.

चर्चेअंती असा ठराव पारीत करण्यात आला की, संबंधीत न्‍यायाधिशांविरोधात न्यायप्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व तोपर्यंत सर्व वकिल संबंधीत न्‍यायाधिशांच्‍या कोर्टासमोर न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नाहीत. पेनडाऊन आंदोलन करतील. त्यानुसार हे आंदोलन सुरू होते. दोन दिवस हे आंदोलन चालल्यानंतर आज वकील संघाने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

आंदोलनात जिल्हा वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ व्ही. के. जाधव, अ‍ॅड. ज्योती पत्की, अ‍ॅड. पसरटे, अ‍ॅड. दासुद, अ‍ॅड. तिळवे, अ‍ॅड. अविनाश आवटे, अ‍ॅड. राकेश कुलकर्णी, अ‍ॅड. सुजित पाटील, अ‍ॅड. विलास के. पाटणी, अ‍ॅड. सोमनाथ लड्डा, अ‍ॅड. रविंद्र शिरसाट, अ‍ॅड. शेख अनिस, अ‍ॅड. विलास वाघ, अ‍ॅड. सुनिल जाधव, अ‍ॅड. सदानंद सोनुने, अ‍ॅड. खंडागळे, अ‍ॅड. लालसरे, अ‍ॅड. सुरेश काळे, अ‍ॅड. भगवान दळवी, अ‍ॅड. दिपक अग्रवाल, अ‍ॅड. शरद भदाने, अ‍ॅड. संदिप चव्हाण, अ‍ॅड. उमेश दाभाडे, अ‍ॅड. रामेश्वर हनवते, अ‍ॅड. कल्पना जकाते, अ‍ॅड. शेषराज मुळे, अ‍ॅड. स्मिता पाटील, अ‍ॅड. कैलास पवार, अ‍ॅड. विश्वनाथ शिंदे, अ‍ॅड. अमितकुमार उदगे, अ‍ॅड. कन्हैया शर्मा अ‍ॅड. काथार आदिंसह बहुसंख्य वकील सहभागी होते.