सहायक पोलीस आयुक्त विशाला ढुमेंना नियमित जामीन  

औरंगाबाद,१६ जानेवारी / प्रतिनिधी :- महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाला ढुमेंना सोमवारी दि.१६ सकाळी सिटीचौक पोलिसांनी अटक केली. ढुमेंना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता त्‍यांची  रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍यात आली. त्‍यानंतर ढुमेंनी नियमित जामीनासाठी अर्ज सादर केला, अर्जावरील सुनावणीवेळी आरोपी हे वरिष्‍ठ अधिकारी असून ते तपासात अडथळा निर्माण करु श‍कतात. घटनास्‍थळावरुन सीसीटीव्‍ही चित्रण जप्‍त करण्‍यात आले असून आरोपीने महिलेचा विनयभंग करुन त्‍यांच्‍या पतीसह इतर नातेवाईकांना देखील मारहाण केल्याने आरोपीला जामीन देण्‍यात येवू नये अशी विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी केली. तर ढुमेंच्‍या वतीने अॅड. गोपाल पांडे यांनी सर्वोच्‍च न्यायालयाच्‍या आर्णेश कुमार प्रकरणाच्‍या खटल्याचा हवाला देत आरोपी विशाल ढुमे हे पोलीस अधिकारी असल्याने ते पसार होण्‍याची शक्यता नाही. गुन्‍ह्याखाली त्‍यांना जास्‍तीजास्‍त सात वर्षे किंवा त्‍यापेक्षा कमी शिक्षा आहे. तसेच कोर्टाला जामीन देण्‍याचा अधिकार असल्याचा युक्तीवाद केला. सुनावणीअंती प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.पी. बेदरकर यांनी २५ हजारांच्‍या

जात मुचलक्यावर ढुमेंचा नियमीत जामीन अर्ज मंजूर केला. प्रकरणात अॅड. पांडे यांना अॅड. किरण कुलकर्णी, अॅड. पवन राऊत, अॅड. रुपा साखला यांनी सहाकार्य केले.