रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या पोलिस कोठडीत वाढ    

औरंगाबाद,१० मे /प्रतिनिधी :

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या  दोघा पॅथॉलॉजी लॅब चालकासह परभणीतील एकाच्‍या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत दि.१३ वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एन. माने यांनी सोमवारी दि.१० दिले. संदीप चवळी आणि गोपाल गांगवे अशी पॅथॉलॉजी लॅब चालकांची नावे असून त्‍यांना ४ मे तर माधव शेळके असे परभणी येथील आरोपीचे नाव असून त्‍याला ५ मे रोजी पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात पोलिसांनी संदिप चवळी व गोपाल गांगवे या दोघांना सापळा रचून अटक केली होती. त्यांच्याकडून सहा रेमडेसिवीर जप्त करण्यात आले. अन्‍न व औषध विभागाचे निरीक्षक जीवन जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुंडलीकनगर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. चौकशीमध्ये आरोपी संदीप चवळी याने माधव शेळके याच्‍याकडून प्रत्‍येकी आठ हजार रुपये प्रमाणे सहा इंजेक्शन विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्‍या पथकाने माधव शेळके याला अटक केली.

पोलिस कोठडी दरम्यानचा तपास

आरोपी संदीप चवळी याने डॉ. जावेद खान याच्‍या मदतीने १५ दिवसांपूर्वी परभणी येथे जावून शेळके याच्‍याकडून एक रेमडेसिवीर विकत आणून साक्षीदार नितीन वाघचौरे यांना सहा हजार रुपयांत विक्री केले होते. चवळी याने शेळके कडून सहा रेमडेसिवीर विकत आणल्‍या बाबत डॉ. योगेश पडुळ यांनी दिलेल्या जबाबावरुन पुरावा हस्‍तगत करण्‍यात आला आहे. आरोपी शेळके याने परभणी येाथील जिल्‍हा सामान्‍य रुग्णालयातील कोवीड वार्डाच्‍या शेजारील वार्ड मधून स्‍टाफची नजर चुकवून सहा रेमडेसिवीर आणल्‍याची कबुली दिली. गुन्‍ह्यात पोलिसांनी अतिरि‍क्त जिल्हा शल्‍य चिकित्‍सकांसह इतर कर्मचार्यांची तसेच आरोपी शेळके याच्‍या पत्‍नीचा देखील जबाब नोंदविण्‍यात आला आहे.

आरोपींच्‍या कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी आरोपीन शेळकेने जिल्‍हा सामान्‍य रुग्णालयातून सात रेमडेसिवीर कसे व कोणाकडून घेतले याचा तपास करणे आहे. आरोपीची पत्‍नी ही सदर रुग्णालयात कोवीड वार्डाची प्रमुख स्‍टाफनर्स म्हणून काम करते, त्‍यामुळे तिने रेकॉर्ड अपडेट ठेवून आरोपीला इंजेक्शन दिले होते का याचा आणि आरोपीने सुमोर १५ दिवसांपूर्वी चवळी व डॉ. जावेद खान यांना एक रेमडेसिवीर विकत दिले होते, ते आरोपीने कोठून आणले होते याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपींच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.