लसीकरणाचे नियोजन नसेल तर मग जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत?-नवाब मलिक यांची केंद्रावर टीका

केंद्र सरकार पाकिटमार सरकार बनलेय का?-नवाब मलिक

मुंबई ,१० मे /प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडे चार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत. जबाबदारी स्वीकारल्यानंतर जर ती पार पाडण्याची क्षमता आणि नियोजन नसेल तर मग जाहिरातबाजी करुन निर्णय का जाहीर केले जात आहेत? आज साडे चार लाख लोकांना दुसरा डोस मिळत नाही. १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसच उपलब्ध नाही. तरीही एकामागून एक निर्णय जाहीर करण्याची घाई केंद्र सरकारला लागली आहे. यापेक्षा अधिक ढिसाळ कारभार असू शकत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. यावर उपाय शोधण्यासाठी तात्काळ सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली गेली पाहिजे. तसेच यावर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय टास्क फोर्सची स्थापना करुन त्यासाठी एक नेता निवडला गेला पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी केली.

Image

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मागील १५ महिन्यांत केंद्र सरकारने त्या त्या वेळी आवश्यक निर्णय घेतलेले नाहीत. निर्णय घेतेवेळी देखील योग्य ते निर्णय घेतले गेले नाहीत. मागच्या वर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा जागतिक स्तरावर आरोग्यविषयक आणीबाणी घोषित करण्यात आली, तेव्हा केंद्रीय आरोग्य मंत्री सांगत होते की, भारतात कोरोनाचा प्रभाव दिसणार नाही. त्यानंतर मार्च महिन्यात रुग्णसंख्या कमी असताना तीन ते चार महिन्यांचा लॉकडाऊन पंतप्रधानांनी घोषित केला. मात्र सध्या दररोज लाखो कोरोनाचे रुग्ण आढळत असताना लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली जात आहे. देशपातळीवर रोज चार लाखांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अशावेळी राज्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. केंद्र सरकारने काहीतरी ठोस असा राष्ट्रव्यापी निर्णय घ्यावा, तरच कोरोना महामारी नियंत्रित होऊ शकेल, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मांडली आहे.

निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भात ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहिले आहे. पण या घोषणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी शंका उपस्थित केली आहे.

हा केवळ चुनावी जुमला होता असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसांनी जनतेला सांगू शकतात. त्यामुळे जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. त्याप्रमाणेच भाजपचे नेते राजभवन हे राजकीय आखाडा बनवत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

परवानगीविना पश्चिम बंगालमधील परिस्थितीची चौकशी करण्याचा अधिकार सीबीआयला नाही. मात्र ज्याप्रमाणे बंगालचे राज्यपाल याबाबत राजकीय भाष्य करत आहेत ते पाहता त्यांना राजकारणात रुची दिसते. त्यामुळे राजकारणात रुची असलेल्या राज्यपालांना पंतप्रधान मोदींनी पदमुक्त करावे आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देऊन मंत्री वा वेगळी जबाबदारी देऊ करावी असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.