पक्षचिन्हासोबत आता पक्षाध्यक्षपदावरही शिंदेंचा दावा

नवी दिल्ली ,७ ऑक्टोबर/प्रतिनिधी :-धनुष्यबाण कोणाचा? पक्ष कोणाचा? याबद्दल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचाही लढा सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना पक्षाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदावरही शिंदेंनी दावा सांगितला आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक प्राथमिक सदस्य आपल्या पाठीशी आहेत, असा उल्लेखही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

आज शिवसेनेचे पक्षचिन्ह कोणाचे? ठाकरेंचे की शिंदेंचे यावर आज निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आजची शेवटची तारीख आहे, त्यामुळे आज शिवसेना फक्त पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे ही सुनावणी आज होणार नाही. दरम्यान, धनुष्यबाण आम्हाला द्या, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.