मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमारप्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-अंबादास दानवे

उच्च स्तरीय समिती नेमून चौकशीची राज्यपालांकडे केली मागणी-अंबादास दानवे

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :-जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत सुरु असलेल्या आंदोलनातील मराठा बांधवांवर पोलीसांकडून अमानुष लाठी हल्ला करण्यात आला, याप्रकरणी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि याप्रकरणाची उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना उबाठा पक्षाच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांना भेटून दिले.

  यापूर्वी बारसु येथील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. नंतर पंढरीच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांवर आणि आता आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर लाठीमार केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व लहान मुलांचा समावेश आहे.  निष्पाप महिला व लहान मुलांवरील लाठी हल्ला महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. आंदोलनकर्ते आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती. परंतु कुठूनतरी सुचना आल्या आणि पोलीसांनी अमानुष लाठीमार सुरु केला. त्यामुळे लाठी हल्ला करण्याबाबतच्या सुचना शासनाकडून देण्यात आल्या किंवा पोलीसांनी स्वत: हून लाठी हल्ला केला याबाबत राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच, ज्यांनी लाठी हल्ल्याचा आदेश दिला त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेवून लाठीमार झाल्याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी बिनर्शत माफी मागितली आहे. तथापि, सरकारने केवळ माफी मागून चालणार नाही तर स्वत: च्या हक्कासाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या निरपराध मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार करुन जखमी करणा-या सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारुन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधिक्षकास जबाबदार धरुन त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे. या घटनेत महिला,  लहान मुले व आंदोलकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरचे सर्व गुन्हे राज्य शासनाने बिनशर्त मागे घ्यावे. लाठीहल्याप्रकरणी निवृत्त न्यायाधिशांमार्फत उच्च स्तरीय चौकशी करुन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच, याप्रकरणी दोषी असलेल्या संबंधीत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. याबाबत कारवाई करण्याबाबत आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर,आ.अजय चौधरी,आ.सुनील प्रभू, आ.ॲड.अनिल परब,आ. रविंद्र वायकर,  आ.रमेश कोरगावकर, आ.प्रकाश फापर्तेकर, आ.सुनील शिंदे,आ. ऋतुजा लटके, आ.सचिन अहिर, आ.विलास पोतनीस, आ.कैलास पाटील

आ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख राजू राठोड व समनव्यक शरीफ देशमुख उपस्थित होते.